Pakistan Plane Crash : पाकिस्तान हवाई दलाच्या (PAF) प्रशिक्षण मोहिमेदरम्यान एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची घटना घडली. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला असून, प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मर्दानजवळ झालेल्या या भीषण अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तानच्या लष्कराच्या जनसंपर्क विभागाने (ISPR) दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान हे पाकिस्तान हवाई दलाचे प्रशिक्षण विमान होते. विमान नियमित प्रशिक्षण सॉर्टीवर असताना ते मर्दान परिसरात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील दोन्ही वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला.
दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू
या अपघातात पाकिस्तान हवाई दलाचे फ्लाइट लेफ्टनंट मुहम्मद कासिम अब्दुल्ला आणि पाकिस्तान नौदलाचे लेफ्टनंट ताहा अब्बासी यांचा मृत्यू झाला. प्रशिक्षण उड्डाणादरम्यान दोघेही विमानात उपस्थित होते. अपघातानंतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र दोघांनाही वाचवता आले नाही.
काही वृत्तांनुसार, विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि परिसरात आगीचे लोळ उसळले. सोशल मीडियावर या दुर्घटनेशी संबंधित काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. मात्र त्यांच्या सत्यतेबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. काही अहवालांमध्ये जमिनीवरील तीन जण जखमी झाल्याचाही उल्लेख आहे.
Just In : 2 Pakistan Airforce pilots lost their lives after a PAF aircraft crashed in the Sawaldher area of Katlang, Mardan , Pakistan. pic.twitter.com/bi7hScPtz1
— Baba Banaras™ (@RealBababanaras) June 15, 2026
चौकशीचे आदेश
अपघाताचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी, पाकिस्तान हवाई दलाच्या मुख्यालयाने चौकशी समिती स्थापन केली आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी तपास पूर्ण होईपर्यंत अधिकृत कारण स्पष्ट होणार नाही, असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
या दुर्घटनेनंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी शोक व्यक्त केला आहे. दोन्ही वैमानिकांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांच्या सेवेला श्रद्धांजली वाहण्यात आली.
हेही वाचा: Ind vs Afg, ODI Match : आयपीएलमध्ये मिळाली नाही संधी, अफगाणिस्तानविरुद्ध काढलं उट्टं
अलीकडेच, पाक-व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे कोसळले होते. त्या दुर्घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच घडलेला हा आणखी एक गंभीर लष्करी विमान अपघात असल्याने पाकिस्तानच्या लष्करी उड्डाण सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
Join Our WhatsApp Community

