Sanchita Ugale Suicide : लोकप्रिय टीव्ही आणि सिने-अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या नालासोपारा येथील राहत्या घरी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अवघ्या 30 वर्षीय अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनामुळे मनोरंजन विश्वासह तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संचिता नालासोपारा परिसरात आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होती. ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा कुटुंबातील इतर सदस्य घराबाहेर गेले होते, तर संचिता घरी एकटीच होती. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा: NEET 2026 Exam: पुनर्परीक्षेपूर्वीच सर्व्हर क्रॅश, परीक्षेआधीच विद्यार्थ्यांची चिंता वाढली
आत्महत्येपूर्वी बनवली होती रील
चित्रपट आणि मालिकांसोबतच, संचिता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय होती. इन्स्टाग्रामवर तिचे 1 लाख 39 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रील शेअर केली होती.
या व्हिडिओमध्ये ती ‘डफली वाले, डफली बजा’ या गाण्यावर लिपसिंक करताना आनंदी दिसत होती. या पोस्टला तिने ‘मैं नाचूं, तू नचा’ असे कॅप्शन दिले होते. तिच्या निधनानंतर या शेवटच्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये चाहते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
हेही वाचा: घाई करू नका, अन्यथा दुबार पेरणीचे संकट! Monsoon लांबल्याने कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोठा इशारा
घराघरांत पोहचलेला चेहरा
अतिशय कमी वयात संचिताने अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ती ‘कुमकुम भाग्य’ (Kumkum bhagya) आणि ‘वागले की दुनिया’ (Wagle Ki Duniya) यांसारख्या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकांमध्ये झळकली होती.
याशिवाय, ‘दिलवाली दुल्हा ले जाएगी’ या मालिकेत तिने अभिनेता सौरभ बेदी याच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली होती. अलीकडेच ती दंगल टीव्हीवरील ‘साजन घर में’ या मालिकेतही दिसली होती.
छोट्या पडद्यावरील यशाबरोबरच संचिता उगलेने चित्रपटांमध्येही आपली छाप सोडली होती. विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चर्चित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटात तिने ‘ताराबाई’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
Join Our WhatsApp Community

