Bhandup water crisis : भांडुपमध्ये पाणीटंचाईचे भीषण संकट; डोंगराळ भागांतील नागरिकांचे हाल, नेमके कारण काय?

पाण्याची पर्यायी व्यवस्था करताना सामान्य नागरिकांच्या अक्षरश: नाकीनऊ येत आहेत.

115
प्रातिनिधीक फोटो

Bhandup water crisis : गेल्या काही दिवसांपासून, भांडुप परिसरातील अनेक डोंगराळ वस्त्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः उंच भागात राहणाऱ्या रहिवाशांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी वाढली असून प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली जात आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला पाणीपुरवठा होत असला, तरी त्याचा दाब अत्यंत कमी असल्याने घरांपर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे पाण्याची पर्यायी व्यवस्था करताना सामान्य नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत.

भांडुप पश्चिमेतील श्रीरामपाडा, तुळशेतपाडा, वाघोबावाडी, तानाजेवाडी, टेंभीपाडा, खिंडीपाडा, साई हिल, गावदेवी टेकडी आणि इतर उंच भागांमध्ये यापूर्वीही कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती. अशा भागांमध्ये पाणी वरच्या स्तरापर्यंत पोहोचवताना तांत्रिक अडचणी निर्माण होतात, असे जलविभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Mumbai: मुंबईतील स्मशानभूमी प्रदूषणमुक्त होणार, हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पालिकेचे महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबईच्या जलवाहिनी यंत्रणेवर वाढता ताण

मुंबईला दररोज विविध धरणांमधून हजारो दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. त्यातीलच एक असलेले भांडुप जलशुद्धीकरण केंद्र हे शहरातील सर्वात मोठ्या पाणीप्रक्रिया केंद्रांपैकी एक मानले जाते. इथून शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी वितरित केले जाते. मात्र जलवाहिन्यांमधील गळती, जुन्या पाईपलाइन, पाण्याचा कमी दाब आणि तांत्रिक बिघाड यांमुळे काही भागांत पाणीपुरवठ्याच्या समस्या वारंवार उद्भवत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

अलीकडेच भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाण्याचा दाब कमी झाल्याची नोंद झाली होती. यामुळे वितरण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

दरम्यान, स्थानिक नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांनी महानगरपालिकेकडे निवेदने देऊन कमी दाबाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जलवाहिन्यांची तपासणी, अतिरिक्त पंपिंग सुविधा, जलसाठा क्षमता वाढविणे आणि डोंगराळ भागांसाठी स्वतंत्र नियोजन करावे, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

हेही वाचा: Crime : कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ महिला चोरांच्या टार्गेटवर; २४ तासांत चेन स्नॅचिंगच्या दोन घटना

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.