Beed : मराठवाड्यातील एका ऊसतोड मजूर कुटुंबातील चार सख्ख्या बहिणींची यशोगाथा नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारी आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील हनुमंत चौरे यांच्या चार लेकींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, एकाचवेळी महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवले आहे. या यशामुळे संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
उषा, अर्चना, शीतल आणि गीतांजली या चौघी बहिणी अत्यंत साध्या कुटुंबातून पुढे आल्या आहेत. त्यांचे आई-वडील अनेक वर्षांपासून ऊसतोड मजूर म्हणून काम करत आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही मुलींना शिक्षण द्यायचे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचे, हा पालकांचा निर्धार कायम राहिला. त्याच जिद्दीचे फळ आता संपूर्ण कुटुंबाला मिळाले आहे.
कठोर परिश्रमातून यशाचा मार्ग
ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा, आर्थिक अडचणी आणि स्पर्धेचे आव्हान यांचा सामना करत चारही बहिणींनी पोलीस भरतीची तयारी केली. नियमित अभ्यास, शारीरिक प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत यश मिळवले. त्यांच्या या यशामुळे जिवाचीवाडी गावाचे नाव राज्यभर पोहोचले आहे.
बीड जिल्हा मोठ्या प्रमाणावर ऊसतोड मजुरांसाठी ओळखला जातो. दरवर्षी हजारो कुटुंबे रोजगारासाठी इतर जिल्ह्यांत स्थलांतर करतात. अशा पार्श्वभूमीवर ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील चार मुलींनी पोलीस दलात प्रवेश मिळवणे ही केवळ वैयक्तिक यशोगाथा नसून ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी घटना मानली जात आहे.
मुलींच्या यशानंतर चौरे कुटुंबाचा गावकऱ्यांकडून सत्कार करण्यात आला. अनेक वर्षांच्या कष्टानंतर मुलींनी मिळवलेले हे यश पाहून पालकांनाही समाधान मिळाले आहे. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाचा मार्ग सोडू नये,” असा संदेश या चार बहिणींच्या प्रवासातून मिळत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
हेही वाचा: Crime : कल्याण-डोंबिवलीतील ज्येष्ठ महिला चोरांच्या टार्गेटवर; २४ तासांत चेन स्नॅचिंगच्या दोन घटना
Join Our WhatsApp Community

