-
प्रतिनिधी
लहान मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ज्ञांची टास्क फोर्स नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सोमवारी दिली. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने २९ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात तरुण आणि अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया व्यसनाचे वाढते धोके अधोरेखित करण्यात आले आहेत. या अहवालात मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर वयोमर्यादा ठरविणे तसेच अल्पवयीनांना डोळ्यासमोर ठेवून केलेल्या डिजिटल जाहिरातींवर निर्बंध आणण्याची शिफारस करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Maharashtra Politics : अजितदादांना स्वकीयांनीच रोखलं?; पाचपुतेंचा खळबळजनक दावा)
या अहवालाच्या पार्श्वभूमीवर शेलार (Ashish Shelar) यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव वीरेंद्र सिंह यांना तज्ज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करण्याबाबत लेखी निर्देश दिले आहेत. आर्थिक पाहणी अहवालातील शिफारशी आणि तज्ज्ञांनी मांडलेल्या पुराव्यांच्या आधारे राज्यासाठी संतुलित तसेच माहितीपूर्ण धोरण ठरविण्यासाठी विभागाने या विषयाचा सखोल अभ्यास करावा. त्यासाठी आवश्यक असल्यास सर्वांगीण अभ्यासासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करावा, असे निर्देश शेलार यांनी दिले आहेत. या टास्क फोर्समध्ये शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, बालसमुपदेशक, तंत्रज्ञान तज्ज्ञ, व्यवस्थापन तज्ज्ञ, डॉक्टर, कायदेतज्ज्ञ तसेच संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
(हेही वाचा – Union Budget 2026 : दक्षिणेकडील राज्ये समृद्ध तर उत्तरेकडील राज्यांबाबत हात आखडता!)
प्रस्तावित टास्क फोर्सच्या कार्यक्षेत्रात मुलांचे संरक्षण आणि सुरक्षितता, मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम, डिजिटल प्लॅटफॉर्मचा संतुलित आणि जबाबदार वापर, शिक्षण आणि एकूण विकासावर होणारा परिणाम, सांस्कृतिक तसेच कौटुंबिक घटक, लिंगनिहाय फरक, ग्रामीण आणि शहरी परिस्थितीतील भेद, सर्व उत्पन्न गटांचा समावेश, उत्पादकता आणि व्यापक आर्थिक परिणाम तसेच मुलांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चौकटींचा आढावा यांचा समावेश करण्याच्या सूचनाही शेलार (Ashish Shelar) यांनी केल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

