Mumbai: मंडळांनी वीज जोडण्या तपासणी करावी, गणेशोत्सव समितीची सूचना

12
Mumbai: मंडळांनी वीज जोडण्या तपासणी करावी, गणेशोत्सव समितीची सूचना
Mumbai: मंडळांनी वीज जोडण्या तपासणी करावी, गणेशोत्सव समितीची सूचना

Mumbai: काळाचौकी येथे गणेशोत्सवाच्या परिसरात विजेचा धक्का लागून दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मुंबईतील गणेश मंडळांना विद्युत सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. मंडपातील विद्युत व्यवस्थेची तातडीने तपासणी करून कोणतीही त्रुटी आढळल्यास ती दुरुस्त करेपर्यंत संबंधित जोडणीचा वापर करू नये, असे समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी स्पष्ट केले.

गणेश दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सुरक्षितता ही गणेश मंडळांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने दिलेल्या विद्युत सुरक्षेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन समितीने केले आहे. मंडपातील संपूर्ण विद्युत यंत्रणेवरील भार मंजूर मर्यादेपेक्षा अधिक नसावा. मुख्य तारा, विद्युत वाहिन्या, स्विच, स्वयंचलित विद्युत संरक्षक यंत्रणा आणि गळतीरोधक यंत्रणेची क्षमता विद्युत भारानुसार असावी. प्रत्येक विद्युत उपकरणासाठी स्वतंत्र आणि योग्य भूसंपर्क व्यवस्था करणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्युत जोडणीला गळतीरोधक यंत्रणा बसवून तिची कार्यक्षमता तपासावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा  – Delhi gang rape : दिल्लीत प्रसिद्ध कालकाजी मंदिराजवळ अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, एका आरोपीला पोलीस चकमकीनंतर अटक; दोघांचा शोध सुरू

मुख्य विद्युत तारा सुरक्षित आवरणाच्या असाव्यात आणि त्या योग्य नळ्यांमधून सुरक्षितपणे नेण्यात याव्यात. तारांना शक्यतो जोड देऊ नये. मंडपाबाहेरून मुख्य विद्युत वाहिन्या नेण्याची आवश्यकता असल्यास संरक्षित विद्युत वाहिन्यांचा वापर करावा.

प्रत्येक विद्युत जोडणीची विद्युतरोधक क्षमता योग्य तपासणी यंत्राद्वारे तपासावी. तसेच संपूर्ण विद्युत यंत्रणेची तपासणी परवानाधारक विद्युत कंत्राटदाराकडून करून घ्यावी. तपासणीचा अहवाल तयार ठेवावा आणि मागणी केल्यास तो सादर करावा, असे समितीने म्हटले आहे.

भाविकांच्या जीवाला प्राधान्य
गणपतीची सेवा म्हणजेच प्रत्येक भाविकाची सुरक्षितता जपणे होय. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी सजावट आणि रोषणाईपेक्षा भाविकांच्या जीवाला प्राधान्य देऊन सर्व अनिवार्य विद्युत सुरक्षा नियमांची पूर्तता तातडीने करावी, असे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले आहे.

ओलसर ठिकाणी घ्यावी खबरदारी
पावसाळ्यात आणि ओलसर वातावरणात विद्युत सुरक्षेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणी तात्पुरत्या विद्युत जोडण्या, दुकाने, रोषणाई किंवा उघड्या तारांची व्यवस्था राहणार नाही, याची मंडळांनी विशेष काळजी घ्यावी. मंडपातील विद्युत व्यवस्था सुरक्षित आहे की नाही, याची तातडीने पुन्हा तपासणी करावी. सजावट व रोषणाईपेक्षा भाविकांचा जीव अधिक मौल्यवान आहे. त्यामुळे विद्युत सुरक्षेच्या सर्व आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता करावी, असे आवाहन ॲड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.

समितीच्या प्रमुख सूचना-

विद्युत भार मंजूर मर्यादेत ठेवावा.

प्रत्येक उपकरणाला योग्य भूसंपर्क व्यवस्था करावी.

प्रत्येक जोडणीला गळतीरोधक यंत्रणा बसवावी.

उघड्या तारा आणि असुरक्षित जोडण्या टाळाव्यात.

ओलसर व पाणी साचणाऱ्या ठिकाणी विद्युत जोडणी ठेवू नये.

परवानाधारक कंत्राटदाराकडून विद्युत यंत्रणेची तपासणी करून घ्यावी.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.