“पाकिस्तानवर आमचा विश्वास नाही”; US-Iran Peace Deal वरुन नाराज इस्रायलचे पाकिस्तानला खडेबोल

इस्रायली अधिकाऱ्यांचा पाकिस्तानला शांतता चर्चेतील "विश्वासार्ह मध्यस्थ" मानण्यास नकार

79
इस्रायली अधिकाऱ्याची पाकिस्तानच्या भूमिकेवर चर्चा
भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर (सौजन्य: ANI)

US-Iran Peace Deal : अमेरिका आणि इराण यांच्यात अनेक महिन्यांच्या तणावानंतर (US Iran war) शांतता कराराचा मार्ग मोकळा होत असतानाच, दुसरीकडे पाकिस्तानची (Pakistan) भूमिका चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. शांतता करारासंबंधीच्या वाटाघाटींमध्ये, पाकिस्तानने ‘मध्यस्थ’ म्हणून भूमिका बजावल्याचा दावा केला जात असला, तरी याच मुद्द्यावरून इस्रायलने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला “विश्वासार्ह मध्यस्थ” मानण्यास नकार देत, त्याच्या भूमिकेवर ठळकपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

इस्रायल विरोधी भूमिकेमुळे पाकिस्तनला विरोध

भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर (Reuven Azar) यांनी, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या मध्यस्थी भूमिकेबद्दल असमाधानी असल्याची भावना व्यक्त केली होती. “इस्रायलला अमेरिका-इराण चर्चेमध्ये पाकिस्तानचा सहभाग मान्य नाही,” असे स्पष्ट मत रुवेन यांनी व्यक्त केले होते. यासोबतच भारतातील इस्रायलचे वाणीज्यदूत आणि इस्रायलमधील काही वरिष्ठ राजकीय नेत्यांनी देखील पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले.

इस्रायलचे म्हणणे आहे की, “पाकिस्तानने आजपर्यंत स्वतंत्र इस्रायलला मान्यता दिलेली नाही. याशिवाय पाकिस्तानमधून वेळोवेळी इस्रायलविरोधी भूमिका मांडली जाते. त्यामुळे अशा देशाला मध्यस्थ मानणे कठीण असल्याचे इस्रायचे मत आहे.”

हेही वाचा: US – Iran War Ends : युद्ध समाप्तीनंतरही तेलाच्या किमती ८० डॉलरच्या वरच राहण्याचा अंदाज

पाकिस्तानची भूमिका नेमकी काय होती?

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारासंबंधीचा संवाद यापूर्वी अनेकदा खंडित झाला होता. त्यादरम्यान, कतारसोबत पाकिस्ताननेसुद्धा या दोन देशांमध्ये मध्यस्थी करत, संवाद घडवून आणण्याचे काम केल्याचा दावा करण्यात आला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवाद प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे, अनेक आंतरराष्ट्रीय अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, यासंबंधी इस्लामाबादमध्येही काही चर्चासत्रे झाली होती, ज्यामध्ये पाकिस्तानने स्वतःला दोन्ही देशातील संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्नशील देश म्हणून सादर केले होते, तर अमेरिकेचे आणि इराणचे प्रतिनिधी अप्रत्यक्ष चर्चेत सहभागी झाल्याचा दावाही करण्यात आला होता.

इस्रायलची तीव्र नाराजी

इस्रायलची मुख्य चिंता इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित आहे. इस्रायली नेतृत्वाचा दावा आहे की, इराणकडे अण्वस्त्र क्षमता विकसित होऊ नये यासाठी कठोर भूमिका आवश्यक आहे. मात्र नव्या शांतता करारात युद्धविराम, होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणे आणि काही निर्बंधांमध्ये सवलत यावर भर देण्यात आला असून इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमासारखे काही संवेदनशील मुद्दे पुढील चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. यामुळे इस्रायलमधील अनेक नेते नाराज आहेत.

काही इस्रायली नेत्यांचे मत आहे की या करारामुळे इराणला आर्थिक दिलासा मिळू शकतो आणि त्यामुळे त्याची प्रादेशिक ताकद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Monsoon 2026 : महाराष्ट्रात पुढील 24 तासांत पावसाची स्थिती कशी राहणार? काय सांगतो IMD rain alert

2026 च्या सुरुवातीपासून अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. इराणशी संबंधित लष्करी कारवाया, होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षेचा प्रश्न आणि मध्यपूर्वेतील संघर्ष यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. त्यानंतर विविध देशांच्या मध्यस्थीने चर्चा सुरू झाली. अखेर अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम आणि पुढील वाटाघाटींसाठी एक प्राथमिक करार तयार करण्यात आल्याचे वृत्त समोर आले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.