खूशखबर! चंद्रपूरात टायगर सफारी सुरू होणार…

128

चंद्रपूर हा नैसर्गिक साधन संपत्ती असलेला जिल्हा असून या नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग करून जिल्ह्याचा पायाभूत तसेच पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. साबरमती नदीच्या धर्तीवर इरई नदीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच टायगर सफारी प्रकल्पाला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. राज्याच्या निधीतून 77 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असून चंद्रपूरात लवकरच टायगर सफारी सुरू होईल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे बोलताना दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदान येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण करतांना ते बोलत होते.

3,510 वनराई बंधारे बांधले

ऐतिहासिक आणि वनभूमी असलेला हा जिल्हा आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्याचा विकास करण्याला आपले प्राधान्य आहे. यात इरई नदीचे सौंदर्यीकरण, व्याघ्र सफारी यासोबतच पायाभूत सुविधा अंतर्गत रस्ते, जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा, अभ्यासिका, ग्रामपंचायत इमारतींचे सुसज्ज बांधकाम केले जाईल. पुढे बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात रब्बी हंगामातील क्षेत्रात 43 हजार 440 हेक्टरने वाढ करण्यात आली आहे. करडई पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्रात 2,463 हेक्टर वाढ झाली आहे. जिल्ह्यात कृषी, महसूल, ग्रामविकास, शिक्षण, वन विभाग व इतर सेवाभावी संस्थांच्या मदतीने लोकसहभागातून 3,510 वनराई बंधारे बांधले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2020-21 या वर्षात 4,442 घरकूल पूर्ण झाली आहेत. तर प्रपत्र ‘ड’ मध्ये या आर्थिक वर्षात 10,377 चे उद्दिष्ट प्राप्त झाले असून मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत 9,286 घरे तर शबरी आवास योजना ग्रामीण अंतर्गत 3,654 घरकुल बांधण्यात आले. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2,106 वीज ग्राहकांना पारंपरिक पध्दतीने तर 1,433 शेतक-यांना सौर कृषी पंपाद्वारे नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा यंदाच्या वर्षी राज्यात कर वाढ होणार का? काय म्हणाले अजित पवार?)

3 लक्ष 75 हजार क्विंटल धान खरेदी करण्यात

महिला व बालकल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांना घरपोच आहार पुरविण्यात येत आहे. सन 2021-22 या वर्षात नवीन अंगणवाडी बांधकाम, इमारत दुरुस्ती व शौच्छालय बांधकामासाठी 8 कोटी तसेच जिल्ह्यातील 350 आदर्श – मॉडेल अंगणवाडी केंद्राकरीता 5 कोटींची तरतूद उपलब्ध केली आहे. ‘डायल-112’ प्रकल्पांतर्गत 40 महिंद्रा बोलेरो आणि 83 दुचाकी देण्यात आल्या आहेत. जिल्हा खनिज प्रतिष्ठामध्ये प्राप्त निधीतून एकूण 1,488 कामांसाठी 284 कोटी 93 लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यास मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. सन 2021-22 मध्ये जिल्ह्यातील एकूण 70 धान खरेदी केंद्रावर 13 हजार 331 शेतक-यांकडून 3 लक्ष 75 हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे, असे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारांते सौंदर्यीकरण 

चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले येत्या तीन वर्षात यासाठी 60 ते 70 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाईल. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या 3 ते 4 प्रवेश गेटचे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नगर परिषद नगर पंचायत क्षेत्रात असलेल्या अतिक्रमण धारकांना घरकुलसाठी नागपूरच्या धर्तीवर 500 फूट जागा देण्याचे नियोजन आहे. शहरातील 13 झोपडपट्टीतील जवळपास 400 कुटुंबांना नझुलचे पट्टे देण्यात येईल. महाज्योतीच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी एक हजार तर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी दोन हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. जेईई – नीटची तयारी करणा-या 3 हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. ओबीसींच्या मुलांना कमर्शियल वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले. या प्रजासत्ताक दिनाप्रसंगी जिल्हा सैनिक कार्यालयाकडून देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.