संजय राऊत जेलमध्ये पण ठाकरे गटाच्या मनामध्ये, उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राऊतांसाठी राखीव खुर्ची

120

राज्यातील सत्तांतरानंतर बुधवारी पहिल्यांदाच शिवसेना गट प्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानात संपन्न होत आहे. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय म्हणणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच या मेळाव्याच्या मंचावर एक चमत्कारिक दृश्य पहायला मिळाले.

राऊतांसाठी राखीव खुर्ची

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या कोठडीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला संजय राऊत यांची कमतरता भासत आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यासाठी प्रसिद्ध असल्याने या मेळाव्यातही संजय राऊत यांची जागा कायम ठेवण्यात आली आहे. मेळाव्यासाठी उभारण्यात आलेल्या मंचावर संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची राखीव ठेवण्यात आली असून राऊतांचे नाव देखील त्या खुर्चीवर लिहिण्यात आले आहे. त्यामुळे संजय राऊत हे जेलमध्ये असले तरी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांच्या मनात मात्र ते आहेत असा संदेश आता मिळत आहे.

राऊतांच्या अडचणी वाढल्या

दरम्यान, संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून राऊतांना  अटक करण्यात आली असून राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत सातत्याने वाढ होत आहे. 27 सप्टेंबर रोजी विशेष पीएमएलए न्यायालयात या प्रकरणीत सुनावणी पार पडणार आहे. तोपर्यंत राऊत यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.