Prakash Ambedkar : वंचितचा महाविकास आघाडीला अल्टिमेटम; ‘या’ दिवसानंतर स्वतंत्र लढण्याची भूमिका घेणार 

शाहू महाराज छत्रपती यांना आमच्या पक्षाच्या वतीने संपूर्ण पाठिंबा असून त्यांना निवडून आणण्यासाठी जे काय प्रयत्न असतील ते पक्षाच्यावतीने केले जातील, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

167
अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये वंचितला सहभागी करून घेण्याविषयी केवळ चर्चाच सुरु आहे, निवडणूक घोषित झाली तरी यावर निर्णय होत नाही. त्यामुळे अखेर वंचितचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीला अल्टिमेटम दिला. जर २६ मार्चपर्यंत महाविकास आघाडीने भूमिका ठरवली नाही तर २६ मार्चनंतर वंचित बहुजन आघाडी आपली पुढील भूमिका स्पष्ट करेल, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काय म्हणाले अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर? 

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवीन पक्ष काढला असून एक यादी आमच्याकडे दिली आहे. त्यांना आम्ही सांगितले की, आमचे महाविकास आघाडीबरोबर भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आता काही सांगू शकत नाहीत. प्रकाश शेंडगे आणि आमच्यामध्ये दीड तास चर्चा झाली. त्यामध्ये ते कोणते मतदारसंघ मागतात, हे आम्ही ऐकूण घेतले. महाविकास आघाडीचे भांडण जर मिटत नसेल, तर आम्ही त्यांच्यामध्ये कुठे शिरायचे? आजही महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू असून तिढा कायम आहे. त्यांचा तिढा सुटला की नाही? याबाबत आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचा तिढा मिटणार नसेल तर आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन तरी काय उपयोग? आम्ही फक्त २६ मार्चपर्यंत थांबणार आहोत. २६ तारखेला वंचित बहुजन आघाडीची जी काही भूमिका असेल ती आम्ही स्पष्ट करणार आहोत, असा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीला दिला.

‘वंचित’चा शाहू महाराजांना पाठिंबा

कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. “शाहू महाराज छत्रपती यांना आमच्या पक्षाच्या वतीने संपूर्ण पाठिंबा असून त्यांना निवडून आणण्यासाठी जे काय प्रयत्न असतील ते पक्षाच्यावतीने केले जातील”, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.