MVA : महाविकास आघाडी नसून महा ‘ड्रग ‘आघाडी आहे; शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा घणाघात

135

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. सुरक्षारक्षकांच्या गराड्यात राहायची त्यांना सवय नाही. आतापर्यंत वर्षा बंगला फक्त व्हीआयपीं साठीच राखीव होता. पहिल्यांदाच असे घडले की, गणेशोत्सवा निमित्त वर्षा बंगला सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. त्यावेळेस दररोज १० ते १५ हजार भाविक तिथे दर्शनासाठी येत होते.त्यावेळेस येणाऱ्या भाविकांपैकी विरोधकांना फक्त एल्विस यादवच दिसला, इर्शाळवाडीची अनाथ मुले त्यांना का दिसली नाहीत? अथर्वशीर्ष पठण करणारे नागरिक का दिसले नाहीत? एल्विस यादव हा आमचा जावई नाही, अशा शब्दात शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी शनिवारी येथे एका पत्रकार परिषदेत खा. संजय राऊत यांचा समाचार घेतला.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी आज एका पत्रकार परिषदेत बोलताना एल्विस यादव हा कुविख्यात ड्रग माफिया मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणेशोत्सवावेळी गणपतीची आरती करायला कसा काय आला? त्याला कुणी निमंत्रण दिले? आदी प्रश्न उपस्थित करत, या प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच राज्यांतल्या ड्रग प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंब व राजकीय कुटुंब असा उल्लेख करत गंभीर आरोपही केला होता.

(हेही वाचा Veer Savarkar : ‘वसईचा राजा’ला हर घर सावरकर समिती आणि महाराष्ट्र शासन यांचा ‘गणेश सजावट पुरस्कार’ प्राप्त)

त्याची दखल घेत, शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनीही राऊत यांच्यावर शेलक्या शब्दांत चांगलेच तोंडसुख घेतले.डॉ. ज्योती वाघमारे पुढे म्हणाल्या की, खरे तर मंत्री आणि मुख्यमंत्री हे सुरक्षारक्षकांच्या गराड्यातच असतात, असे आतापर्यंत महाराष्ट्राने अनुभवले होते. कारण या आधीचे जे मुख्यमंत्री होते ते कधी घराबाहेर पडलेच नाहीत आणि कधी पडले तर सुरक्षारक्षकांच्या गराड्यातच बाहेर पडायचे.पण आमचे मुख्यमंत्री सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. सुरक्षारक्षकांच्या गराड्यात राहायची सवय नाही. ते सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे आणि जमिनीवर राहणारे मुख्यमंत्री आहेत.

पण ड्रग्स प्रकरणामध्ये चर्चा होत असलेल्या ललित पाटीलला माजी मुख्यमंत्री व उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हातामध्ये शिवबंधन बांधून नाशिकचा युवा नेता केले होते. माजी मंत्री नवाब मलिकांचा जावई असलेला समीर खान ड्रग्स डिलर्सना पैसे पुरविण्याचे काम करायचा. तसेच ललित पाटील ड्रग प्रकरणात अटक झालेला सलमान फाळके हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. ललित पाटील, समीर खान,सलमान फाळके,सचिन वझे ही कुणाची पिलावळ आहे,याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे.ही खरं तर महाविकास आघाडी (MVA) नसून, ही महा ‘ड्रग’आघाडी आहे.त्यामुळे यांनी आमच्यावर आरोप करून नयेत, त्यांची ती योग्यता नाही, अशा खणखणीत शब्दात डॉ. वाघमारे यांनी संजय राऊत यांची चांगलीच कानउघडणी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.