आदित्य ठाकरे यांच्या पालकमंत्री म्हणून महापालिका मुख्यालयात बैठका अनेक, पण अधिकृत बैठका तीनच

124

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपनगरांचे पालकमंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या महापालिकेतील फेऱ्या अनेक झाल्या असून अनेकदा त्यांनी पालकमंत्री म्हणून महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासोबत आढावा बैठकही घेत निर्देश दिले आहेत. परंतु आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री म्हणून महापालिका आयुक्तांसोबत केवळ तीनच बैठक घेतल्याची माहिती अधिकारातून माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांनी केवळ एकच आढावा बैठक घेतली असून एक बैठक वरळी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांसंदर्भात आणि एक बैठक केवळ त्यांच्या निर्देशानुसार बेस्ट उपक्रमाबाबत घेतली असल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर २९ नोव्हेंबर २०१९ला उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर डिसेंबरमध्ये शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाले. त्यानंतर शहराचे पालकमंत्री म्हणून अस्लम शेख यांची तर शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांची उपनगराचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी उपनगराचे पालकमंत्री म्हणून महापालिका आयुक्तांसोबत बैठका घेतल्या. अनेकदा आदित्य ठाकरे यांनी या बैठका घेऊन या बैठकांमध्ये आयुक्तांच्या माध्यमातून संबंधित विभागांना निर्देशही दिले होते. तसेच या बैठकीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती.

आदित्य ठाकरे यांनी ४ डिसेंबर २०१२ रोजी महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांसमवेत महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतील रस्त्यांची सुधारणा, पादचाऱ्यांना चालता यावे अशाप्रकारचे पदपथ, रस्त्यांचे रुंदीकरण, सेनापती बापट मार्ग व लव्हग्रोव्हचे सुशोभिकरण, वरळी किनार पट्टीचे सुशोभिकरण, उद्यान, वाहतूक बेट व दुभाजकांची सुधारणा, इन्क्युबेशन सेंटर, हाजी अली सब व वरळी किल्याचे सुशोभिकरण, स्ट्रीप गार्डनचा विकास, रेल्वे स्थानक परिसराची सुधारणा, इतर सुशोभिकरणाची कामे, मध्यवती खात्यांमार्फत केली जाणारी कामे आदींचा आढावा घेतला. मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांनी आपल्या मतदार संघातील कामांचा पहिला आढावा घेतला.

त्यानंतर १ जानेवारी २०२१ रोजी बेस्टची आर्थिक स्थिती व आवश्यक सुधारणा आदींसंदर्भात बेस्ट उपक्रमाच्यावतीने आयुक्तांच्या उपस्थित आदित्य ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी बेस्टला आवश्यक सूचना केल्या होत्या. त्यानंतर ६ जानेवारी २०२२ रोजी वरळी कोळीवाड्यातील मासेमाऱ्यांच्या समस्येबाबत बैठक घेत कोस्टल रोडसंदर्भात सूचना केल्या.

परंतु या तीन बैठकांव्यतिरिक्त पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांची आयुक्तांसोबत अधिकृत एकही बैठक झाली नाही. पालकमंत्री म्हणून आदित्य ठाकरे हे वारंवार महापालिका मुख्यालयात येवून आयुक्तांसोबत बैठक घेत होते, परंतु कागदोपत्री इतिवृत्त बनलेल्या तीन बैठकांचीच माहिती प्रशासनाकडे असून इतर वेळी आदित्य ठाकरे हे आयुक्तांसोबत बैठका घेत होते,पण ते रेकॉर्डवर नव्हत्या अशीच माहिती ही माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे पालकमंत्री म्हणून येत नसून केवळ आपल्या मतदार संघातील कामांसंदर्भात किंवा खासगी कामे करण्यासाठीच आयुक्तांची भेट घेत होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.