माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश

103
माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश
माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश

उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि तीन वेळा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षण सभापती पद भूषवलेले मंगेश सातमकर यांनी शुक्रवार, २८ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी बोलताना सातमकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी त्यांच्या कामाची चर्चा करणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी तीन वेळा मला भेटून माझ्याशी सर्व विषयावर विस्तृतपणे चर्चा केली. शिवसेनेमध्ये मी गेली ३२ वर्षे काम करत असूनही पक्षप्रमुखांना मला कधी भेटायला वेळ मिळाला नाही. त्यांनाच काय त्यांचे निकटवर्तीय पदाधिकारी देखील मला माझ्या अडचणी समजून घेण्यासाठी कधीही भेटले नाहीत. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांना भेटल्यानंतर कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेणारा नेता भेटल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी आज विधानसभेत १० हजार आणि दुकानासाठी ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. तसेच उमेद अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटांना भरीव मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगितले.

एखादा कार्यकर्ता जेव्हा अडचणीत असतो तेव्हा नेत्याने मागे ठामपणे उभे रहावे अशी त्याची अपेक्षा असते. पण जेव्हा अडचणी येतात तेव्हाच नेमकं पाठबळ मिळालं नाही तर मग कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कायम कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहायचे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नवे बळ मिळायचे. अनुभवी कार्यकर्ता घड्यावयला खूप वेळ लावतो मात्र तो गमवायला एक क्षण पुरतो. त्यामुळे शिवसेनेमध्ये मंगेश सातमकर यांना पूर्णपणे न्याय देण्यात येईल. तसेच त्यांच्या प्रभागातील प्रलंबित प्रश्न राज्य शासनाच्या पुढाकाराने नक्की सोडवले जातील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शिवसेना उपनेत्या कला शिंदे, शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी तसेच सातमकर यांच्या प्रभागातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यात ‘या’ तारखेला महामेट्रोचे होणार उद्घाटन)

मंगेश सातमकर यांची माहिती

मंगेश सातमकर हे गेली ३२ वर्षे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात कार्यरत होते. सातमकर हे १९९४ साली पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. आजवर अनेकदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सातमकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. यात मुंबई जिल्हा नियोजन समिती सदस्य, एमएमआरडीए समिती सदस्य, मुंबई मनपा शिक्षण समितीचे तीन वेळा सभापतीपद अशा पदांचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेतील अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.