MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वर्षांचा इतिहास आणि काय आहे भविष्य?

154

पु.ल. देशपांडे यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हटलं जातं. एकेकाळी राज ठाकरे सुद्धा महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व होते. राज ठाकरे म्हणजे जबरदस्त वक्तृत्व, परखड व्यक्तिमत्व. शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) ची स्थापना केली. सुरुवातीला मराठी माणसासाठी झटणारी मराठी माणसाची स्वतःची हक्काची संघटना असे स्वरुप होते. अर्थात शिवसेनेची सुरुवात देखील अशीच झाली होती.

राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरलेले राज ठाकरे

२०१२ सालच्या महानगरपालिकेत तर या पक्षाने चमत्कार करुन दाखवला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेत २८ नगरसेवक निवडून आले. ठाण्यात ७, पुण्यात २९, तर नाशिकमध्ये ४०. त्याचप्रमाणे २००९ सालच्या विधानसभेत पुणे, मुंबई, नाशिक व ठाण्यात एकूण १३ आमदार निवडून आले. आणखी १३ उमेदवार दुसर्‍या तर २९ उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे फॅक्टरमुळे मुंबईतील शिवसेनेचे सर्व ६ उमेदवार पडले होते. हा असा काळ होता, जेव्हा मोदींना राष्ट्रीय उदय झाला नव्हता आणि फडणवीसांची ताकदही फारशी मोठी नव्हती. त्यावेळी राज ठाकरे हे महाराष्ट्राचे लाडके नेते होतील, महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू होतील असे वाटले होते. मात्र २०१४ नंतर मनसेला  (MNS) उतरली कळा लागली. मनसेने उत्तर भारतीयांच्या विरोधात बंड पुकारुन त्यांना मारहाण केली. याचं कारण त्यांच्या मते उत्तर भारतीय मराठी माणसाच्या नोकर्‍या आणि धंदे हिरावून घेतात.

(हेही वाचा MNS : राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी मांडली मनसेची भूमिका; टोल, मुंबई-गोवा महामार्ग आणि मराठा आरक्षण…सगळे काही रोखठोक)

यशस्वी आंदोलनाची चर्चा  

मनसेने  (MNS) ’मराठी पाट्या’ हे अतिशय चांगले आंदोलन हाती घेतले होते. कार्यालये आणि दुकानांबाहेर मराठी पाट्या असल्याच पाहिजेत हा आग्रह अगदी योग्य होता आणि हे आंदोलन बर्‍यापैकी यशस्वीही झाले. तसेच त्यांनी फेरीवाल्यांचा मुद्दा हाती घेतला. परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे स्थानिकांना त्रास होतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये मराठी शिकवले जाणे अनिवार्य असल्याचा मुद्दाही मनसेने उचलला. हा मुद्दा योग्य असला तरी त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा मराठी शाळांचा होता. मराठी शाळांची दुर्दशा होत असताना हा मुद्दा फारसा चर्चेला आला नाही. कारण अनेक नेत्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात.

…तर पक्षाचे भविष्य धोक्यात 

त्याचबरोबर मनसेने  (MNS)  इतर अनेक मुद्दे आणि आंदोलन हाती घेतले. मुंबई रेल्वे भरती बोर्डची परीक्षा देणार्‍या उत्तर भारतीयांना केलेली मारहाण असो, अबू आझमी यांच्यासोबत झालेली बाचाबाची असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडली. ‘लाव रे तो व्हिडिओ’ या माध्यमातून त्यांनी नरेंद्र मोदींवर कठोर टीका केली. मात्र याचा राज ठाकरेंना आणि मनसेला फायदा झाला नाही. उलट तोटाच झाला. मोदींवर केलेली टीका त्यांना इतकी महागात पडली की मनसेची जादू अक्षरशः कमी झाली. आपला मराठीचा मुद्दा कामी आला नाही म्हणून मनसेने आता हिंदूत्व हाती घेतले आहे. आता येणार्‍या पालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसेचं भवितव्य ठरणार आहे. या निवडणुकीत त्यांना लाभ झाला नाही तर मनसेचे भविष्य धोक्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.