“शिंदे-ठाकरेंना मी एकत्र आणणार, शेवटपर्यंत हाती भगवाच धरणार” हकालपट्टीनंतर रामदास कदम भावनिक

98

शिवसेनेत उभी फूट पाडण्याचे काहींचे मनसुबे आहेत. लोकांना ते हवं आहे, मात्र मी कदापि ते पूर्ण होऊ देणार नाही. मी एकनाथ शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणणार. त्यांनी माझी हकालपट्टी केली असली, तरी मी एक शिवसैनिक आहे. बाळासाहेबांचा मावळा आहे. मी मरेपर्यंत हाती भगवाच धरणार, अशा शब्दांत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना संबोधले आहे. रामदास कदम मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा होती. आता ते एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेली शिवसेना अशी पत्त्यासारखी कोसळून पडताना, अतिशय दु:ख होत आहे, असे सांगताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले.

साहेब गेल्यानंतर बैठका घेणे बंद केले

शिवसेनेतून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात बाहेर पडलेल्या गटाला पुन्हा शिवसेनेत आणणार, असा निश्चय रामदास कदम यांनी बोलून दाखवला. ते म्हणाले, शिवसेनेत फूट कशी पडेल, हे काही लोकांना हवे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 32 किल्ले दिले. आग्रा येथून परतताना 40 किल्ले घेतले. अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांनीही काही पावले मागे येण्याची गरज आहे. मी वयाने मोठा आहे, पण सल्ला देण्याएवढा मोठा नाही. आपण ठाकरे आहात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हाला विचारायचे.. गजानन किर्तीकर, रामदास कदम.. नावं घेत विचारायचे. साहेब गेल्यापासून बैठका घेणेच बंद केले आहे.

( हेही वाचा: “जे होईल ते पाहून घेऊ,अमित शहा यांचा आमच्यावरही दबाव” राऊतांचा खळबळजनक दावा )

शरद पवारांनी पक्ष फोडला

ज्या राष्ट्रवादी काॅंग्रेसमुळे शिवसेनेत फूट पडली आहे, त्यांच्या नेत्यांची साथ सोडण्याऐवजी उद्धव ठाकरे स्वत:च्याच पक्षातील नेत्यांची हकालपट्टी करत आहेत. यावरुन रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, आत एक आणि बाहेर एक असं मी कधीही करत नाही. मला सगळ्या गोष्टी समजतात. दिवसाला पाचशे- हजार लोकांना भेटतो. जगलोय ते पक्षासाठी आणि मरणारही भगव्या झेंड्यासाठी. भविष्यात पक्षाचे नेतृत्व आपल्याकडेच असावे. आपण बाळासाहेबांचे सुपुत्र आहात. पण आज जे घडलंय ते शरद पवारांनी घडवून आणलं आहे. त्यांच्यामुळे पक्ष फुटला आहे. त्यांच्यामुळे आमदार- खासदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असा आरोप कदम यांनी यावेळी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.