Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी स्वतः ‘मातोश्री’ला पैसे दिले; शिंदे गटाच्या आमदाराचा आरोप 

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठे विधान केले.

147

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडले आहे. महाराष्ट्रात खंडणीखोर सरकार असून त्यांनी पैसे गोळा करण्यासाठी अनेक एजंट नेमले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. राऊतांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठे विधान केले. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी मातोश्रीवर पैसे दिले. संजय राऊतांसारखी लोक एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तुकड्यावर मोठे झाले आहेत, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली. राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदे हे पैसे वसुल करणारे किंवा खंडणी घेणारे नेते नाहीत. ते लोकांना दोन हातांनी दान देणारे आहेत. त्यांनी ‘मातोश्री’वर किती पैसे दिले असतील, हे त्यांनाच माहीत नसेल. त्यामुळे संजय राऊतांसारख्या माणसाने आरोप करताना हे पाहिले पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पैशावरच त्यांच्या दुकानदाऱ्या सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तुकड्यावर तुम्ही (संजय राऊत) मोठे झाले आहात. आता त्यांनाच तुम्ही नावे ठेवत आहात. एकनाथ शिंदे उदार मनाचा माणूस आहे, त्यांनी सगळ्यांना भरभरून दिले आहे. संजय गायकवाड पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर १०० टक्के पैसे दिले आहेत. त्यात काहीही नवीन नाही. अनेक नेत्यांनी मातोश्रीवर पैसे दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.