एकनाथ खडसेंना गटनेता केल्याने राष्ट्रवादीत नाराजीनाट्य

172

प्रदेश भाजपातील नेत्यांशी पंगा घेऊन दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांच्या खांद्यावर विधान परिषदेच्या गटनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादीला होणार असला, तरी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांना डावलत बाहेरून आलेल्यांना मोठी संधी दिली जात असल्याने राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्या गटनेतेपदी नियुक्तीचे पत्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना देण्यात आले होते. शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, खडसे यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादीतील काही आमदार नाराज झाल्याची चर्चा आहे.

(हेही वाचा पाच हक्कभंग प्रस्ताव आले; पण निर्णय घेण्यासाठी विधानपरिषदेत हक्कभंग समितीच नाही!)

राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे हे गटनेते पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, आयत्यावेळी त्यांचा पत्ता कापत एकनाथ खडसे यांना संधी देण्यात आली. खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे, त्याचा फायदा करून घेण्यासह जेष्ठत्त्वाच्या निकषावर त्यांची निवड केल्याचे वरिष्ठांचे म्हणणे आहे. परंतु, ज्येष्ठत्व आणि अनुभवाचा निकष लावला असेल, तर पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या रामराजे निंबाळकर का डावलण्यात आले, असा सवालही नाराज गटाकडून उपस्थित केला जात आहे.

खडसेंना विरोध का?

एकनाथ खडसे अनुभवी असले, तरी ते पक्षात अलिकडेच दाखल झाले आहेत. शिवाय सातत्याने आजारी पडत असल्याने, आक्रमक भाजपाला टक्कर देतील, अशी त्यांची शारीरिक स्थितीही नाही. अशावेळी एखाद्या तरूण-तडफदार नेत्याला संधी दिली असती, तर पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडता आली असती, असे काही आमदारांचे मत असल्याचे कळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.