पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची बैठक! राजू शेट्टींच्या आंदोलनाची घेतली दखल

स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मागील आठवड्यापासून ठाकरे सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

68

राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावर ठाकरे सरकारने तातडीने १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली, मात्र ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचली नाही, म्हणून स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलन केले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी, ६ सप्टेंबर रोजी बैठक बोलावली आहे.

राजू शेट्टींना बैठकीसाठी निमंत्रण!

स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मागील आठवड्यापासून ठाकरे सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  पूरग्रस्तांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित करून राजू शेट्टी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आता सरकारसाठी राजू शेट्टी अडचणीचे ठरणार आहेत. म्हणून राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी राजू शेट्टी यांनाही निमंत्रण केले.

साधा तलाठी भेटायला आला नाही. पण आज आंदोलनाचा अंदाज आल्यावर धावपळ सुरू झाली. आता मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. या बैठकीत निर्णय झाला नाही, तर रस्ते आडवावे लागतील. मंत्र्यांना गाव बंदी करावी लागेल. तरी देखील निर्णय घेतला नाही तर प्रत्येक गावातील नद्यांमध्ये जलसमाधी आंदोलन केले जाईल.
– राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी संघटना.

म्हणून राजू शेट्टी आंदोलनाच्या भूमिकेत!

ठाकरे सरकारने विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी दिली आहे. मात्र या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसने वगळले आहे, असे वृत्त येऊ लागले आहे. मात्र शरद पवार यांनी आम्ही दिलेला शब्द पळाला आहे. शेट्टी यांचे नाव यादीत घातले आहे. पण त्यावर राज्यपालांनी निर्णय घ्यायचा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र त्याला शेट्टी यांनी विरोध केला. आमदार व्हायचे की नाही हा मुद्दा महत्वाचा नाही. पूरग्रस्तांना मदत होणार की नाही, यावर शरद पवारांनी बोलावे. पूरग्रस्तांना राज्य सरकारने मदत जाहीर केली. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. आमदारकी द्यावी की देऊ नये, हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचे आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असेही शेट्टी म्हणाले. आमदारकीच्या मुद्यावर शेट्टी यांचा हिरमोड झाला म्हणून त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.