दादर स्थानकाबाहेर शक्तीप्रदर्शन करण्यात शिवसेना रंगली, तिकडे शाखेबाहेरच भाजपने बांधली हंडी

95

मुंबईत दहीहंडींचे आयोजन करत एकप्रकारे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन करण्यात येत असताना विरोधी पक्षांना शह काटशह देण्यासही सुरुवात केली जात आहे. भाजपने मुंबईत १३७ ठिकाणी दहीहंडींचे आयोजन केल्यानंतर शिवसेनेनेही शाखांच्यावतीने दहीहंडींचे आयोजन करत एकप्रकारे शिवसैनिकांमधील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु दादरमधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रिती पाटणकर आणि प्रकाश पाटणकर यांनी नक्षत्र मॉलशेजारी हंडीचे आयोजन एकप्रकारे दादरमध्ये शक्तीप्रदर्शन केले, परंतु याच पाटणकर यांच्या शाखेसमोर भाजपचे विक्रांत आचरेकर यांनी हंडी बांधून शिवसेना शाखेसमोर भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

( हेही वाचा : दहीहंडी २०२२ : दिवसभरात ७८ गोविंदा जखमी)

शिवसैनिकांमधील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न

मुंबईत गोपाळकाल्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला असून आधी नोटबंदीमुळे दहीहंडीचे आयोजनाचे प्रमाण कमी झालेले असताना कोविड निर्बंधामुळे दोन वर्षांत या हंडींचे आयोजनही होऊ शकले नाही. परंतु यंदा निर्बंधमुक्त गोविंदाचा सण साजरा करताना आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, मनसे तसेच इतर पक्षांच्यावतीने दहीहंडींचे आयोजन करत प्रत्येक गोविंदा पथकांची सलामी स्वीकारली. भाजपने मुंबईभर दहीहंडींचे आयोजन केल्यानंतर, शिवसेनेनेही प्रत्येक शाखांच्यावतीने हंडी बांधून एकप्रकारे शिवसैनिकांमधील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेच्या शाखेसमोर भाजपने बांधली हंडी

मुंबईतील शिवसेनेच्या काही माजी नगरसेवक, आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी शाखांच्यावतीने हंडींचे आयोजन करताना शाखांसमोर किंवा गर्दीची ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी हंडी बांधली. पण ज्याठिकाणी शिवसेनेच्या हंडींचे आयोजन शाखांसमोर करण्यात आले नाही, त्याठिकाणांवर भाजपने हंडींचे आयोजन केल्याचे पहायला मिळाले आहे. दादरमधील प्रभाग १९२च्या माजी नगरसेविका प्रिती पाटणकर आणि प्रकाश पाटणकर यांनी नक्षत्र मॉलसमोर हंडींचे आयोजन करत संपूर्ण परिसर भगवामय करत एकप्रकारे शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाटणकर हे नक्षत्र मॉलसमोर शक्ती प्रदर्शन करत असतानाच दुसरीकडे त्यांच्या गोखले रोड उत्तर येथील अनुग्रह हॉटेलसमोरील चौकांत शिवसेना शाखेसमोरच भाजपच्या युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत आचरेकर यांनी हंडींचे आयोजन केले होते. शिवसेनेच्या शाखेसमोर भाजपने हंडी बांधून एकप्रकारे त्यांना आव्हानच दिले आहे. विशेष ज्या ठिकाणी भाजपने हंडीचे आयोजन केले होते, त्याठिकाणी शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचे कार्यालय आहे. त्यामुळे शिंदे गट आणि उध्दव गटाच्या शिवसेना शाखांसमोर भाजपने हंडीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करत एकप्रकारे आव्हान निर्माण केल्याचे पहायला मिळत होते. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी शाखेपासून लांब हंडीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करताना शाखांच्या परिसराचा ताबा भाजपने हाती घेतल्याचे चित्र दादरमध्ये पहायला मिळत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.