Bangladesh : बांगलादेशातील हिंदू समाजामध्ये गेल्या काही दिवसांपासून धगगत असलेल्या असंतोषाचे रुपांतर, तीव्र आंदोलनात झाले आहे. प्रभू श्रीराम (Prabhu Shree Ram) यांच्या प्रतिमेचा कथित अवमान, तसेच गाइबांधा जिल्ह्यात सुरू असलेल्या राममूर्ती प्रकल्पाविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आता राजधानी ढाका (Dhaka) येथे हजारो हिंदू नागरिक रस्त्यावर उतरल्याचे वृत्त आहे. आंदोलनादरम्यान “जय श्रीराम”च्या घोषणा देण्यात आल्या, तर सरकारकडे दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
शुक्रवारी, ढाक्यातील शाहबाग चौक परिसरात याच मुद्द्यावरुन भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. विविध हिंदू संघटना, विद्यार्थी गट आणि अल्पसंख्याक हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याचे सांगितले जात आहे. आंदोलकांनी सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम देत संबंधित घटनेतील जबाबदार व्यक्तींना अटक करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा: Mamata banerjee ना मोठा धक्का! TMC ची तीन बँक खाती गोठवली; एकूण किती कोटी रुपयांवर रोख?
काय आहे संपूर्ण वाद?
मिळालेल्या माहितीनुसार, रंगपूर विभागातील गाइबांधा जिल्ह्यातील पलाशबारी भागात हिंदू समाजाच्या पुढाकाराने भगवान श्रीराम यांची भव्य मूर्ती आणि मंदिर संकुल उभारण्याचे काम सुरू होते. स्थानिक हिंदू समुदायाच्या निधीतून हा प्रकल्प राबवला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र या प्रकल्पाला काही इस्लामी कट्टरपंथी संघटनांनी विरोध दर्शवल्याचा आरोप आहे. त्यानंतर आंदोलन, निषेध मोर्चे आणि प्रक्षोभक वक्तव्यांची मालिका सुरू झाली.
याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेवर चप्पल किंवा जोडे मारल्याचा दावा करण्यात आला आहे. हिंदू संघटनांचे म्हणणे आहे की या घटनेमुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, यामुळेच देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
राममूर्ती प्रकल्पालाही विरोध
गाइबांधा येथील प्रस्तावित राममूर्ती प्रकल्पावरूनही वाद निर्माण झाला आहे. काही इस्लामी गटांनी या प्रकल्पाला विरोध करत प्रशासनाकडे हस्तक्षेपाची मागणी केली होती. वाढता तणाव, धमक्या आणि संभाव्य हिंसाचाराच्या भीतीमुळे मंदिर समितीने मूर्ती उभारणीचे काम तात्पुरते स्थगित केल्याचे वृत्त समोर आले आहे.
हिंदू संघटनांच्या मते, हा केवळ एका धार्मिक प्रतीकाचा प्रश्न नसून बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या श्रद्धा आणि धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित मुद्दा आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणात स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
हेही वाचा: Tuljapur: तुळजाभवानी मंदिरातील सोन्या-चांदीची मोजदाद, गेल्या दोन वर्षांत ४९ किलो सोन्याची भर
सरकारला 72 तासांची मुदत
आंदोलनकर्त्यांनी सरकारला 72 तासांच्या आत ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. या कालावधीत कारवाई न झाल्यास धार्मिक व्यवहार मंत्रालयाला निवेदन देण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच बांगलादेशातील विविध हिंदू संघटनांनी देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केल्याचेही वृत्त आहे.
आंदोलनादरम्यान, काही हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी देशातील सर्व 64 जिल्ह्यांत राममंदिर उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. हिंदू समाजाविरोधातील कथित द्वेषपूर्ण घटनांना उत्तर म्हणून धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मता अधिक मजबूत करण्याची भूमिका या संघटनांनी मांडली.
या संपूर्ण प्रकरणामुळे बांगलादेशातील धार्मिक सहिष्णुता, अल्पसंख्याकांचे हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य या विषयांवर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाकडून पुढील काही दिवसांत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष लागले आहे.


