आदित्य ठाकरेच्या संकल्पनेतील ‘ट्री हाऊस’चे स्वप्न अधांतरीच!

112

मलबारहिलमधील कमला नेहरु गार्डन, हँगिंग गार्डनमध्ये ट्री वॉक उभारण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आल्यानंतर आता वांद्रे किल्ल्याजवळील उद्यानांमध्ये ट्री हाऊस उभारले जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या कामाला मंजुरी दिल्यानंतरही वर्ष उलटत आले तरी ट्री हाऊसच्या कामाला प्रारंभ झाला नाही. वांद्रे किल्ला हा सीआरझेड अंतर्गत येत असल्याने याबाबतची परवानगी प्राप्त न झाल्याने या कामाला सुरुवात झाली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे माजी पालकमंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील हे काम रखडल्याचे पहायला मिळत आहे.

( हेही वाचा : जगप्रसिद्ध नायगारा धबधबा गोठला! अमेरिकेत हिमवादळ, पहा क्षणचित्रे)

मुंबईतील विविध ठिकाणी सौंदर्यात अधिकाधिक भर पाडण्यासाठी महापालिकेच्या मदतीने जिल्हाधिकारी यांच्या निधीतून वांद्रे किल्ल्याजवळील उद्यानात ट्री हाऊस बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या ट्री हाऊसचे बांधकाम महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून पार पाडले जात असून यासाठी लागणारा तब्बल १ कोटी ६ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिल्यानंतर महापालिकेने यासाठी निविदा मागवून पात्र कंत्राटदारांची नेमणूक केली आहे.

या ट्री हाऊसच्या निविदेमध्ये व्हर्गो स्पेशालिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली असून महापालिकेच्या अंदाजापेक्षा सुमारे ६ ते ७ टक्के अधिक बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. या कामासाठी विविध करांसह १ कोटी ६ लाख रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरीही दिली आहे.

ही संबंधित संस्था ट्री हाऊसचा आराखडा बनवणे फॅब्रिकेशन, कलात्मक बांधकाम करणार असून यामध्ये माती विश्लेषणासह जमिनीचे मुल्यांकन आणि जमिनीच्या स्थितीची प्रारंभिक तपासणी, सभोवतालची वृक्ष ट्री हाऊस बांधण्यास अनुकूल आहेत का किंवा कसे याबाबत संशोधन करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. उपनगराचे तत्कालिन पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑगस्ट २०२१ रोजी महापालिकेच्या नियोजन विभागाला निर्देश दिले होते, त्यानुसार नियोजन विभागाने हे काम हाती घेतले आहे. या कामाच्या प्रस्तावाला फेब्रुवारी २०२२ रोजी मंजूरी दिल्यानंतर नवीन वर्ष उजाडले तरीही कामाला सुरुवात झालेली नाही. वांद्रे किल्ला हा सीआरझेड मध्ये मोडणार असल्याने यासाठी महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे, परंतु ही परवानगी नसल्याने या कामाला सुरुवात झाली नसल्याचे म्हटले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.