वेदनाशमन बाह्यरुग्ण विभाग आता कूपर रुग्णालयातही

99

विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात वेदनाशमन अर्थात कर्करोग, संधीवात, मणक्याचे आजाराचे बाह्यरुग्ण विभाग ( पेन क्लिनिक ओपीडी कक्ष) २ जानेवारी २०२३ पासून सुरु करण्यात आला आहे. हा विभाग बधिरीकरणशास्त्र विभागातर्फे दर सोमवारी व शुक्रवारी दुपारी २.०० ते ३.३० वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग येथे कार्यरत असेल. महानगरपालिकेचे परळ येथील केईएम रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर रुग्‍णालय या रुग्णालयांप्रमाणे पश्चिम उपनगरात अशी सेवा देणारे कूपर रुग्णालय हे एकमेव आहे.

( हेही वाचा : राज्याच्या आर्थिक सल्लागार परिषदेत अदानी आणि अंबानी पुत्रांना स्थान)

अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या निर्देशानुसार हा विभाग कार्यान्वित करण्यासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. त्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण करुन सोमवारी २ जानेवारी रोजी कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहीते यांच्या हस्ते हा विभाग सुरु करण्यात आला आहे. बधिरीकरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिता शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग कार्यरत झाला असून डॉ. मेघना पटवर्धन व डॉ. हरप्रीत कौर मदन या वेदनाशमन तज्ज्ञ म्हणून या विभागात कामकाज पाहणार आहेत.

कर्करोग, संधीवात, मणक्याचे आजार, मज्जातंतूचे आजार या आजारांच्या रुग्णांना अतिवेदनेमुळे अत्यंत शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच खासगी रुग्णालयात या आजारांवरील उपचार पद्धतीचा खर्च अंदाजे २० हजार ते ५० हजार रुपये इतका असू शकतो. कूपर रुग्णालयात सुरू झालेल्या या बाह्यरुग्ण विभागाचा फायदा गरीब रुग्णांना होणार आहे, हे उपचार विनामूल्य किंवा अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार आहेत. शस्त्रक्रियेनंतर होणारी तीव्र वेदना व दीर्घकाळ असणारे वेदनेचे निवारण करणे इत्यादी बाबी या वेदनाशमन बाह्यरुग्ण विभागामुळे शक्य होणार आहेत. या उपचार पद्धतीमध्ये वेदनाशमक औषधांव्यतिरिक्त वेगवेगळ्या मज्जातंतूना बधिर करणाऱ्या मार्गाचा अवलंब करण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहीते यांनी दिली आहे.

वेदनाशमन विभागातील डॉ. मेघना पटवर्धन या वेदनाशमन तज्ज्ञ म्हणून मुंबईतील नामांकीत खासगी रुग्णालयांमध्ये गेली १० वर्षे ही सेवा देत आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा व कौशल्याचा फायदा येथील गरजू रुग्णांना व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील (पीजी/एमडी) विद्यार्थ्यांना होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.