राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी अग्निपरीक्षा; बुधवारच्या बैठकीतून समजणार आमदारांचा कौल

179
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी अग्निपरीक्षा; बुधवारच्या बैठकीतून समजणार आमदारांचा कौल
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी अग्निपरीक्षा; बुधवारच्या बैठकीतून समजणार आमदारांचा कौल

अजित पवारांसह समर्थक आमदारांनी शिवसेना-भाजपा युतीला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचीही दोन शकले झाली आहेत. सर्वाधिक आमदार आपल्या पाठिशी असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात कोणाच्या मागे किती संख्याबळ आहे, याची स्पष्टोक्ती अद्यापही आलेली नाही. बुधवारी (५ जुलै) अजित पवार आणि शरद पवार गटाकडून संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आमदारांना व्हीप बजावण्यात आले आहेत. त्यामुळे आमदारांचा कौल नेमका कुणाला, हे या बैठकांतून स्पष्ट होणार आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजता वांद्रे येथे अजित पवार गटाची, तर दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाची  बैठक बोलावण्यात आली आहे. त्यासाठी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. विशेषतः दोन्ही गटांकडून आमदारांना उपस्थितीबाबत व्हीप बजावण्यात आले आहेत. अजित पवार गटाकडून मंत्री अनिल पाटील, तर शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला आहे. मात्र, नेमका व्हीप कोणाचा पाळायचा, याबाबत आमदारांमध्ये संभ्रम आहे.

दरम्यान, अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवारांच्या गटाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आमदारांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांशी फोनद्वारे संपर्क केला जात आहे. त्यामुळे पवारांच्या शब्दाला मान देऊन हे आमदार परततात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

(हेही वाचा – Shambhuraj Desai : उद्धव ठाकरेंनी साद घातली, तर सकारात्मक प्रतिसाद देऊ; शंभूराज देसाईंच्या विधानाने खळबळ)

४० हून अधिक आमदार सोबत – प्रफुल्ल पटेल

४० पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत आहेत. किंबहुना त्यापेक्षा अधिक आमदारांचा आकडा व कार्यकर्त्यांची मोठी फळी आमच्यासोबत राहणार आहे. ते सर्व आमच्या बैठकीला उपस्थित राहतील, याबाबत आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

९ सोडल्यास सर्व आमदार आमचेच – जयंत पाटील

आम्ही ५३ आमदारांपैकी ९ आमदारांवर कारवाई केली आहे. उर्वरित सर्व आमदार आमचे आहेत. त्यांना प्रलोभने देऊ नये, दबाव टाकू नये, असे आवाहन त्या उर्वरित ९ जणांना राहील. त्या सर्व आमदारांना शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचे आहे आणि त्यांना ते करू द्यावे, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.