Police Constable : विषप्रयोग नाही, तर अती मद्यपानामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू?

212
Police Constable : विषप्रयोग नाही, तर अती मद्यपानामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू?
Police Constable : विषप्रयोग नाही, तर अती मद्यपानामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू?

मुंबई पोलिसांच्या सशस्त्र दलातील पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) विशाल पवार (Vishal Pawar) यांचा मृत्यू विषारी द्रव्याने नाही, तर मद्याच्या अतीसेवनाने झाला असल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे पोलिसांकडून या वृताला अधिकृत दुजोरा दिलेला नसला तरी लवकरच याचा उलगडा होईल, अशी शक्यता रेल्वे पोलीस दलातील एका अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. विशाल पवार (Vishal Pawar) या कॉन्स्टेबलने (Police Constable) रुग्णालयात दाखल असताना ठाण्यातील कोपरी पोलिसांना दिलेला जबाब हा बनाव असल्याचे उघडकीस आले असले, तरी पवार यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होत नव्हते.

ठाण्यातील कोपरी येथे भाडेतत्त्वावर राहणारे विशाल पवार हे मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई (कॉन्स्टेबल) या पदावर होते. वरळी सशस्त्र दलात असणारे विशाल पवार (Vishal Pawar) यांनी मृत्युपूर्वी ठाण्यातील कोपरी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे मुंबई पोलीस दलासह रेल्वेत एकच खळबळ उडवून दिली होती. पवार यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना २९ एप्रिल रोजी कोपरी पोलीस ठाण्याला दिलेल्या जबाबात म्हटले होते की, २७ एप्रिल रोजी रात्रीपाळीला कामावर जात असताना सायन – माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास त्याच्या हातावर फटका मारून त्याचा मोबाईल फोन पाडण्यात आला, फोन चोरी करून पळणाऱ्या चोरट्यांचा पवार यांनी रेल्वे रुळातून पाठलाग सुरू केला. त्यावेळी या टोळीतील काही जणांनी त्यांना पकडून मारहाण केली, त्यानंतर त्यांच्या पाठीत विषारी इंजेक्शन टोचले आणि तोंडात लाल रंगाचे द्रव्य ओतल्यामुळे त्यांची शुद्ध हरपली.

(हेही वाचा – Vijay Wadettiwar यांच्या ‘त्या’ विधानाच्या विरोधात भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार)

कॉन्स्टेबल पवार याने खोटी कथा रचल्याचे दादर रेल्वे पोलिसांच्या तपासात समोर आलेले आहे. परंतु त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे गूढ मात्र उकलले नाही. पवार यांच्या मृतदेहाच्या शविच्छेदनानंतर त्यांचा अहवाल राखून ठेवण्यात आला होता तसेच फॉरेन्सिक लॅबकडे काही नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. दादर रेल्वे पोलिसांनी  केलेल्या तपासात विशाल पवार (Vishal Pawar) ला दारूचे अती व्यसन होते. त्यांच्या बँक खात्यावरून विशाल पवार याचा सर्वाधिक खर्च दारूवर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. महिन्याच्या शेवटी पवार यांच्या बँक खात्यात केवळ १०० किंवा २०० रुपये शिल्लक राहत होते. घटनेच्या दिवशीदेखील पवार यांचे बँक बॅलन्स रिकामे होते व घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्याने दारूसाठी सोन्याची अंगठी दारूच्या दुकानात गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु दारू दुकान मालकाने अंगठी घेण्यास नकार दिल्यानंतर त्याने ती अंगठी सोनाराकडे गहाण ठेवली होती, असे पोलिसांच्या तपासात समोर आले.

विशाल पवार (Vishal Pawar) याला घटनेच्या काही दिवसांपूर्वी कावीळ झाली होती. कावीळ पूर्णपणे बरी झालेली नसतानादेखील विशाल पवार अती मद्यपान करीत होता. २७ ते २८ एप्रिल रोजी विशाल पवार (Vishal Pawar) हा सतत दारूच्या नशेत होता. त्याच्या पोटात दारूशिवाय दुसरे काहीही नव्हते, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. २८ एप्रिलला रात्री विशाल पवारला मोठ्या उलट्या होऊ लागल्या होत्या. २९ एप्रिलला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि १ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. दारूच्या अतिसेवनामुळेच पवार यांचा मृत्यू झाला असावा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा विषप्रयोग झालेला नसल्याचा कयास आतापर्यंतच्या पोलीस तपासात समोर येत आहे. फॉरेन्सिक लॅबकडून अधिकृत अहवाल आल्यावर पवार यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. लवकरच हा अहवाल पोलिसांच्या हाती लागणार असून पवार यांच्या मृत्यूचे कारण कळू शकेल, अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.