Ketan Agarwal Case : लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवालचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात तपासातून समोर आलेल्या कथित कटाचे धागेदोरे आता अधिक स्पष्ट होत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात दाखल केलेल्या तब्बल 5,053 पानांच्या आरोपपत्रात या प्रकरणातील नियोजनाचे अनेक टप्पे नमूद आहेत.
पोलिसांच्या दाव्यानुसार, सुरुवातीला केतनला ठार करण्याऐवजी त्याला गंभीर दुखापत करून अपंग करण्याचा प्लॅन करण्यात आला होता. त्यासाठी बाहेरील व्यक्तीची मदत घेण्याचाही प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले. मात्र, हा मार्ग सोडून आरोपींनी स्वतःच कथित हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (Ketan Agarwal Case)
18 जून 2026 ला, केतनचा लोहगड किल्ल्यावरुन पडून मृत्यू झाला. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे या तिघांना मुख्य आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. सुरुवातीला हे प्रकरण अपघात असल्याचे मानले जात होते, मात्र तपासादरम्यान पोलिसांनी हा नियोजित कट असल्याचा दावा केला.
अपंग करण्याचा कथित प्लॅन
आरोपपत्रातील माहितीनुसार, केतनला सुरुवातीला ठार करण्याऐवजी त्याला गंभीर दुखापत करून अपंग करण्याचा विचार करण्यात आला होता. यासाठी महाराष्ट्राबाहेरील एका व्यक्तीशी संपर्क साधल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, बाहेरील व्यक्तीला या कटात सहभागी केल्यास पुढे तपासात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती वाटल्याने हा प्लॅन सोडण्यात आल्याचे तपासात नमूद आहे.
या प्रयत्नाशी संबंधित एका व्यक्तीला नंतर पोलिसांनी साक्षीदार केल्याचेही वृत्त आहे. त्यानंतर केतनला स्वतःच लक्ष्य करण्याचा कथित निर्णय घेण्यात आला. (Ketan Agarwal Case)
पोलिसांच्या तपासानुसार, हत्येसाठी योग्य ठिकाण शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. मे महिन्याच्या अखेरीस सिया आणि चेतनने लोणावळा परिसरातील काही ठिकाणांची पाहणी केल्याचा दावा आरोपपत्रात आहे. त्यामध्ये टायगर पॉइंटसह इतर डोंगराळ भागांचीही पाहणी करण्यात आली. अखेरीस, टायगर पॉइंटवरील काही भागात CCTV नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र पुढे लोहगड किल्ल्याची निवड करण्यात आली.
लोहगडाचीच निवड का?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लोहगडची निवड करण्यामागे केवळ निर्जन ठिकाण हा मुद्दा नव्हता. यापूर्वी लोहगडवर उंचावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आरोपींनी इंटरनेटवर शोधल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
केतनचा मृत्यूही उंचावरून पडल्याने झाला आणि तो सेल्फी काढताना घसरला, असा आभास निर्माण करता येईल, असा कथित विचार करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (Ketan Agarwal Case)
14 जूनचा प्रयत्न आणि बाली ट्रीप
पोलिसांच्या तपासानुसार, 14 जूनला सिया आणि केतन लोहगडवर गेले होते. त्यावेळी केतनला कड्यावरून ढकलण्याचा कथित प्रयत्न झाला. मात्र केतनने स्वतःला वाचवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यानंतर जवळ साप असल्याचे सांगून त्याला कड्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा करण्यात आला. मात्र हा प्रयत्नही यशस्वी झाला नाही.
केतन आणि सिया यांचा Bali येथे प्री-वेडिंग फोटोशूटचा कार्यक्रम ठरला होता. पोलिसांच्या दाव्यानुसार, त्यापूर्वीच हा कथित कट पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. पुढे 6 जूनला, प्रवासादरम्यान सियाने केतनचा पासपोर्ट फाडून तो खालापूरमधील एका कॅफेच्या वॉशरूममध्ये टाकल्याचा आरोप आहे. त्यामुळे Baliचा नियोजित प्रवास होऊ शकला नाही. (Ketan Agarwal Case)
हेही वाचा: Iran War Impact on Global Economy : इराण युद्ध थांबलं तरीही परिणाम जगावर दीर्घकाळ राहील
‘माही’ नावाचं फेक अकाउंट आणि अखेरचा डाव
त्यानंतर कथित कटात सोशल मीडियाचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ‘माही’ या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आले. ओळखीच्या मुलीचा फोटो वापरून हे अकाउंट तयार केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
या अकाउंटवरून केतनशी संपर्क साधण्यात आला. सियाच्या मैत्रिणीच्या नावाने संवाद साधत तिच्या वाढदिवसासाठी सरप्राइज देण्यासाठी सियाला लोहगडवर घेऊन येण्यास केतनला सांगण्यात आल्याचे आरोपपत्रात नमूद असल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या मते, हा प्लॅन रितेश हांगेने आखला होता. (Ketan Agarwal Case)
18 जूनला केतन आणि सिया लोहगडवर पोहोचले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चेतन वेगळ्या मार्गाने किल्ल्यावर पोहोचला होता.
तपासानुसार, केतनचे लक्ष विचलित झाल्यानंतर सियाने त्याला मागून ढकलले आणि चेतननेही त्याला खाली ढकलल्याचा आरोप आहे. त्यानंतर केतन कड्यावरून खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला, असा पोलिसांचा दावा आहे. (Ketan Agarwal Case)
आरोपपत्रात डिजिटल पुराव्यांचा मोठा आधार
या प्रकरणातील आरोपपत्रात WhatsApp चॅट, फोटो, मोबाइल डेटा, कॉल डिटेल रेकॉर्ड, CCTV फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक विश्लेषणाचे पुरावे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. उपलब्ध वृत्तानुसार, तपासात सुमारे 80 ते 85 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यापैकी काहींनी कथित गुन्ह्याची घटना पाहिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (Ketan Agarwal Case)
तपासात सिया आणि चेतनमधील मोठ्या प्रमाणावरील फोन कॉल्स, CCTV फुटेज आणि डिजिटल ट्रेलचाही अभ्यास करण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येपूर्वी ऑनलाइन शोध, चित्रपट आणि गुन्ह्यांशी संबंधित पॉडकास्टच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात आली होती.
5,053 पानांच्या आरोपपत्रात नेमकं काय?
या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिल्यास पोलिसांच्या आरोपपत्रात कथित कटाचे अनेक टप्पे मांडण्यात आले आहेत—सुरुवातीला केतनला गंभीर दुखापत करून अपंग करण्याचा विचार, बाहेरील व्यक्तीशी संपर्क, त्यानंतर ठिकाणांची रेकी, लोहगडची निवड, आधीचा कथित अपयशी प्रयत्न, फेक सोशल मीडिया अकाउंट आणि अखेरीस 18 जूनची घटना.
मात्र, आरोपपत्रातील हे सर्व दावे पोलिसांच्या तपासावर आधारित आहेत. आरोपींवरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community


