-
प्रतिनिधी
वेबसिरीजच्या ऑडिशनच्या बहाण्याने १५ वर्षाच्या १७ मुलांना पवईतील एका स्टुडिओत आणून ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य हा पोलीस कारवाईत ठार झाला आहे. गुरुवारी दुपारी मुंबईतील पवई येथील या ओलीस नाट्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी सायंकाळी घटनास्थळाची पाहणी केली आहे. पवई पोलीस ठाण्यात रोहित आर्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (Hostage)
पवईतील महावीर क्लासिक या इमारतीत असणाऱ्या एका स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी मुंबईकरांना एक थरार बघायला मिळाला. वेबसिरीजसाठी ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने आणण्यात आलेल्या १५ वर्षांखालील १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. घटनास्थळी दाखल झालेले पवई पोलीस, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी रोहित आर्य सोबत चर्चा करण्याची विनंती केली होती. मात्र रोहित आर्य चर्चा करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे बघून पवई पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अमोल वाघमारे यांनी आपल्या पथकासह बाथरूमच्या खिडकीतून स्टुडिओत प्रवेश केला. (Hostage)
(हेही वाचा – ‘आमच्या अधिकारांत हस्तक्षेप करू नका’; अलाहाबाद उच्च न्यायालयाची Supreme Court वर नाराजी)
दरम्यान रोहित आर्य याच्या हातात पिस्तुल होते, आणि संपूर्ण स्टुडिओमध्ये पेट्रोलसदृश्य केमिकल पसरविण्यात आले होते. पोलीस अधिकारी वाघमारे यांनी रोहित आर्यला चर्चा करूया अशी विनंती केली परंतु त्याने पोलिसांच्या दिशेने एअरगन मधून एक फैरी झाडली. पोलिसांनी स्वरक्षणासाठी सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून त्याच्या दिशेने गोळी झाडली असता नेमकी ती गोळी रोहितच्या छातीत घुसली. पोलिसांनी तात्काळ ओलीस ठेवलेल्यांची सुटका करून जखमी रोहित आर्यला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Hostage)
जवळपास तीन तास सुरू असलेल्या या ओलीस नाट्यावर पडदा पडला, पोलिसांनी सुखरूप सुटका केलेल्या १९ जणांना वैद्यकीय तपासणीसाठी विविध रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांचे सर्वांचे जबाब नोंदविण्यात येणार आहे. दरम्यान या सर्व घटनेचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच उपायुक्तांनी घटनास्थळाची पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (Hostage)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

