-
कल्याण : प्रतिनिधी
Kalyan : कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी जिल्हा कारागृहाला जोडलेल्या इलेक्ट्रीक ४४० हायव्होल्टेजच्या फेन्सींगखाली फटाके/स्फोटके पदार्थ फोडून न्यायबंद्यांसह कारागृह रक्षकांच्या जीवाला गंभीर धोका उत्पन्न करणाऱ्या तिन्ही बदमाशांना खडकपाडा पोलिसांनी वेचून जेरबंद केले. हे तिन्ही बदमाश हॅप्पी बर्थडे सतीश मार्तंड कांबळे (Satish Kamble) उर्फ सत्या भाई मिस यू भाई, अशा प्रकारच्या टॅगलाईनमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास गुंडाला शुभेच्छा देण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी करत होते. शिवाय कारागृहाच्या मुख्य दरवाज्याला समोरील इलेक्ट्रीक तारेच्या फेन्सींगखाली लावलेल्या फटाक्यांचा व्हिडीओ बनवून तो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. (Kalyan)
पोलिसांनी सुरूवातीला रोहीत गणेश जगदाळे (२०, रा. दिपेश कॉलनी, सुभाष टेकडी, उल्हासनगर) याची सोमवारी गठडी वळली. त्यानंतर क्षितीज अशोक भगत (२५, रा. शिवशंकर अपार्टमेंट, उल्हासनगर) आणि आकाश अरूण खडसे (१९, रा. लाल चक्की चौक, उल्हासनगर) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. या संदर्भात वरिष्ठ तुरूंग अधिकारी अभिजीत कोळी यांनी सोमवारी खडकपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहितेचे कलम ३२६ (जी), १३२, २७०, ३ (५) सह महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम ३३(१), (एच), १३१ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. (Kalyan)
(हेही वाचा – Pune : पुणेकरांची तहान भागवण्यासाठी २ हजार कोटींचा बोगदा प्रकल्प)
वरिष्ठ तुरूंग अधिकारी अभिजीत कोळी (Abhijeet Koli) यांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश मार्तंड कांबळे उर्फ सत्या नावाचा गुंड वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली कारागृहात जमा आहे. शनिवारी या गुंडाचा वाढदिवस होता. समर्थक साथीदारांनी या गुंडाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट आधारवाडी कारागृह गाठले. आपला भाई आत जरी असला तरी त्याला खुश करण्यासह शुभेछा देण्यासाठी त्याच्या समर्थक असलेल्या तिघा बदमाशांनी मोठे धाडस केले. सुरक्षिततेच्या कारणास्तव कारागृहाच्या मुख्य दरवाजावर थ्री फेज ४४० व्होल्टेज इलेक्ट्रिक करंट वाहत असताना त्याखाली जमीनीवरून आकाशात उडणारे फटाके वजा स्फोटके फोडली. कारागृहातील बंदी आणि रक्षकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना असतानाही कारागृहाच्या समोर इलेक्ट्रीक तार फेन्सींगचे खाली जमीनीवरून हवेत आतषबाजी करणारे स्फोटके/फटाके लावून धोका निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केला. तसेच सरकारी गणवेशात कायदेशीर कर्तव्य पार पाडत असलेल्या कारागृह शिपायांनी या तिन्ही बदमाश्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही या बदमाश्यांनी शिवीगाळ करत धक्का मारून खाली पाडले. त्यानंतर हे तिघेही बदमाश तेथून परागंदा झाले. (Kalyan)
या घटनेची जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलिस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलिस आयुक्त संजय जाधव आणि पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गंभीर दखल घेऊन तपास चक्रांना वेग देण्याचे फर्मान सोडले. कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मागदर्शनाखाली खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, सपोनि विशाल चव्हाण, सपोनि विजय गायकवाड, हवा. बुधकर, हवा. लोखंडे, हवा. म्हात्रे, पोशि बगाड, पोशि शिंदे, पोशि महाजन, पोशि सुरज खंडाळे या पथकाने शोध मोहीम सुरू केली. कोणताही धागादोरा नसतानाही कारागृहातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, तसेच कारागृहातील ई-प्रिझन प्रणालीच्या साह्याने या पथकाने रोहीत जगदाळे, क्षितीज भगत आणि आकाश खडसे या तिन्ही बदमाशांची टप्प्याटप्प्याने गठडी वळली. कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Kalyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

