- मुंबई प्रतिनिधी
Mumbai : मुंबईकरांचा प्रवास आता केवळ लोकल ट्रेन (Local train) आणि कोस्टल रोडपुरता (Coastal Road) मर्यादित न राहता थेट अथांग समुद्रातून होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात (MMR) जल वाहतुकीला नवा आयाम देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ‘मुंबई वॉटर मेट्रो’ प्रकल्प तीन टप्प्यांत राबवण्याची घोषणा केली आहे. ११ नवीन जलमार्ग, २४ अत्याधुनिक टर्मिनल्स आणि २०७ इलेक्ट्रिक बोटींच्या माध्यमातून हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या जलप्रवासी प्रकल्पांपैकी एक ठरणार असून, यामुळे रस्ते आणि रेल्वेवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल.
विधान भवनात आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचा मास्टर प्लॅन सादर केला. विशेष म्हणजे, या वॉटर मेट्रोसाठी लागणाऱ्या बोटींची बांधणी महाराष्ट्रातच व्हावी, यासाठी ‘शिपयार्ड’ विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग येथे ही शिपयार्ड्स उभारली जाणार असून, यातून ‘मेक इन महाराष्ट्र’ला मोठी चालना मिळणार आहे. “गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता देशातील सर्वात मोठी शिपयार्ड सुविधा आपण विकसित करणार आहोत,” असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
(हेही वाचा – आंबा-काजू बागायतदारांच्या नुकसानीची भरपाई याच अधिवेशनात; CM Devendra Fadnavis यांनी दिली मोठी ग्वाही)
प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि विस्तार
मुंबई वॉटर मेट्रो (Mumbai Water Metro) प्रकल्प एकूण ३४० किलोमीटरच्या जलमार्गावर विस्तारलेला असेल. यामध्ये २१५ किमीचे नवीन अकरा मार्ग आणि जुन्या १२५ किमी मार्गांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. सन २०३१ पर्यंत वार्षिक ७.५ कोटी प्रवासी या जलमार्गाचा वापर करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या प्रकल्पात २०७ इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड जहाजांचा वापर केला जाणार असून, यासाठी खासगी ऑपरेटर्सनाही सहभागी करून घेतले जाईल.
पीपीपी मॉडेल आणि गुंतवणूक
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असून, संपूर्ण प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबवण्यात येईल. महाराष्ट्र सागरी मंडळाने केंद्र शासनाच्या क्लस्टर धोरणांतर्गत जहाज बांधणीसाठी सामंजस्य करारही केले आहेत. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमुळे मुंबईच्या दळणवळण क्षेत्रात आता एका नव्या ‘निळ्या क्रांती’ची सुरुवात होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

