चिनी बेटिंग अॅप्सच्या (Betting app) विरोधात इन्स्टाग्रामवर (Instagram) जनजागृतीपर ‘काउंटर रिल्स’ बनवणाऱ्या एका फ्रीलान्स कंटेंट क्रिएटर्सचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत कारवाई करत मुख्य रीलस्टारसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
यश रणधीर बाबरे (रा. विक्रोळी, मुंबई), प्रतीक राम शिंदे (रा. भादलवाडी, इंदापूर, जि. पुणे), अनिकेत राम गोडसे (रा. फलटण, सातारा) आणि समीर सुनील कुचेकर उर्फ एस. के. (रा. चिखली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन चंद्रकांत देवलकर (वय २८, रा. विक्रोळी) हे इन्स्टाग्रामवर विविध कंटेंट तयार करून रिल्स बनवतात. मागील आठ महिन्यांपासून काही प्रसिद्ध रील क्रिएटर्स चिनी बेटिंग अॅप (Betting app) डाऊनलोड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देत होते. हा प्रकार चुकीचा असल्याने फिर्यादी यांनी त्याच्या विरोधात इन्स्टाग्रामवर जनजागृतीसाठी ‘काउंटर रिल्स’ बनवण्यास सुरुवात केली.
या बेटिंग अॅपचे प्रमोशन करणारा रीलस्टार प्रतिक शिंदे (Pratik Shinde) याच्या रिल्स आणि स्टोरीजला फिर्यादींनी ‘रोस्ट’ (Roast) केले होते. याचा राग मनात धरून, ५ ते ६ महिन्यांपूर्वी अनिकेत नावाच्या इसमाने फिर्यादीला धमकीही दिली होती. मात्र, तरीही फिर्यादीने रिल्स बनवणे सुरूच ठेवले.
२६ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी पंचकुटीर पवई येथे आले असता, आरोपी यश बाबरे याने त्यांना गोड बोलून उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीजवळ नेले. तिथे अचानक त्यांची मान पकडून त्यांना गाडीच्या पुढील व मागील सीटच्या मधल्या जागेत ढकलण्यात आले.
(हेही वाचा – युरिया घेताना ‘ही’ सक्ती झाली तर सावध व्हा; कृषीमंत्री Dattatray Bharne यांनी दिला थेट इशारा)
गाडीत आधीच रीलस्टार प्रतिक शिंदे हा को-सीटवर बसला होता आणि अनिकेत हा गाडी चालवत होता. आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यावर पाय देऊन चाकूने वार करण्याची धमकी दिली तसेच लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच मारहाण करतानाचे रील देखील मोबाईलमध्ये तयार करण्यात आले. “आमच्या बेटिंग अॅपच्या (Betting app) विरोधात व्हिडिओ का बनवतोस?” असे म्हणत आरोपींनी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना कळंबोली परिसरात सोडले.
घटनेमुळे प्रचंड घाबरलेल्या फिर्यादीने वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर, २ ऑगस्ट रोजी पवई पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पवई पोलिसांनी (Powai Police) तात्काळ सूत्रे हलवत आरोपी यश बाबरे यास त्याच्या राहत्या परिसरातून ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे केलेल्या चौकशीच्या आधारे प्रतिक शिंदे, अनिकेत गोडसे आणि समीर कुचेकर यांना पुणे जिल्ह्यातील भिगवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शिताफीने अटक करण्यात आली.
सदर धडक कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पवई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून, अटक आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

