-
कल्याण : प्रतिनिधी
Kalyan : कल्याण पूर्वेतील लोकग्राम वसाहतीमधील राम रतन डेअरीलगतच्या चौकात चारही रस्त्यांवर एकमेकांना चिकटून उभारण्यात आलेल्या धोकादायक जाहिरात कमानींमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग ४ जे अंतर्गत येणाऱ्या या चौकात अचानक वाढलेल्या धोकादायक कमानींमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून दुचाकीस्वारांना विशेषतः गर्दीच्या वेळेत जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.
खासदारांच्या सूचनेने पुणे लिंक रोडवरील कमानी हटवल्या
गेल्या काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदा पुणे लिंक रोड परिसरात पक्षाच्या वतीने एकही जाहिरात कमान उभारू नये असे स्पष्ट निर्देश दिल्याचे सांगण्यात येते आणि त्यानुसार तेथील कमानी हटवण्यातही आल्या आहेत. मग त्याच लोकसभा मतदारसंघातील लोकग्रामसारख्या वर्दळीच्या चौकात एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात व्यावसायिक तथा धोकादायक जाहिरात कमानींना परवानगी कशी मिळाली, असा थेट सवाल स्थानिक रहिवासी उपस्थित करत आहेत.
व्यावसायिक कमानींना परवानगी कशी ?
या कमानी रस्त्याच्या अगदी लगत आणि वळणावर उभारल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे. महापालिकेने या जाहिरात कमानींना अधिकृत परवानगी दिली आहे का ? दिली असल्यास रस्त्याच्या परिसरात जाहिरात कमानी उभारण्यासाठी कोणते निकष आणि नियम लागू केले जातात ? वाहतूक शाखेचा ना हरकत दाखला घेतला होता का ? याची पाहणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन करण्यात आली होती का ? असे अनेक प्रश्न स्थानिक रहिवाशांकडून विचारले जात आहेत. दुसरीकडे या कमानींना महापालिकेची परवानगीच नसेल तर या माध्यमातून वसूल होणारे जाहिरात शुल्क अथवा रॉयल्टी नेमकी कोणाच्या खिशात जात आहे ? महापालिकेचा महसूल बुडत आहे का ? याचीही चर्चा सुरू आहे.
केडीएमसीकडून खुलाशाची अपेक्षा
या पार्श्वभूमीवर प्रभाग ४ जे कार्यालयाने तातडीने सदर जाहिरात कमानींची पाहणी करून त्यांना अधिकृत परवानगी आहे की नाही ? परवानगी असल्यास त्याचे निकष काय आहेत आणि नसल्यास त्या तात्काळ हटवून संबंधितांवर कारवाई कधी करणार ? याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी लोकग्राम परिसरातील स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

