-
ऋजुता लुकतुके
CSK Head Coach : इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी २०२७ हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने मोठा बदल केला आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि २०११ विश्वचषक विजेता झहीर खान याची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. झहीर आता स्टीफन फ्लेमिंग यांची जागा घेणार आहे. तब्बल १८ वर्षे चेन्नईच्या संघाशी जोडलेले फ्लेमिंग यांनी यंदा प्रशिक्षकपद सोडल्यानंतर त्यांच्या जागी भारतीय प्रशिक्षकाची निवड करण्यात आली आहे.
झहीरची नियुक्ती ही त्याच्या खेळाडू म्हणूनच्या अनुभवासोबतच युवा खेळाडूंना घडवण्याच्या क्षमतेचा विचार करून करण्यात आल्याचे चेन्नई सुपर किंग्सच्या मालक रूपा गुरुनाथ यांनी सांगितले. संघाचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनीही झहीरला “क्रिकेटमधील उत्कृष्ट बुद्धिमत्ता असलेला” खेळाडू आणि युवा वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन करणारा अनुभवी व्यक्ती म्हणून गौरवले आहे.
झहीर पहिल्यांदा एखाद्या संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. पण, त्याला प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून अनुभव आहे. २०१७ मध्ये त्याची भारतीय संघाच्या गोलंदाजांसाठी सल्लागारपदी निवड झाली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये क्रिकेट संचालक आणि विकासाशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्याने सांभाळल्या. २०२४च्या हंगामात तो लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शकही होता.
(हेही वाचा – Crime News: अहमदाबाद विमानतळावर गांजा तस्करीचा पर्दाफाश, ८.९ कोटी रुपयांच्या गांजासह मुंबईतील एका व्यक्तिला अटक )
खेळाडू म्हणून झहीरची कारकीर्दही प्रभावी राहिली. त्याने भारतासाठी ९२ कसोटी, २०० एकदिवसीय आणि १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. २०११च्या विश्वचषकात भारताच्या विजेतेपदाच्या मोहिमेत तो संघाचा प्रमुख गोलंदाज होता आणि २१ बळींसह स्पर्धेतील भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. आयपीएलमध्ये त्याने १०० सामने खेळून १०२ बळी घेतले.
दरम्यान, झहीरच्या नियुक्तीच्या निर्णयात महेंद्र सिंह धोनीचाही सहभाग असल्याचे चेन्नईचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे. संघाच्या क्रिकेट व्यवस्थापन समितीत धोनी, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रूपा गुरुनाथ यांचा समावेश होता. झहीरला आपल्या सहाय्यक प्रशिक्षकांच्या चमूची निवड करण्याचे स्वातंत्र्यही देण्यात आले आहे.
फ्लेमिंग यांच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच आयपीएल विजेतेपदांसह दोन चॅम्पियन्स लीग टी-२० विजेतेपदे मिळवली. मात्र, सलग तीन हंगाम संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे आता झहीरच्या नेतृत्वाखाली चेन्नई नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

