Trump-Zelenskyy भेटीत काय होणार? रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार का?

Trump-Zelenskyy भेटीत काय होणार? रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार का?

19
Trump-Zelenskyy meeting
Trump-Zelenskyy meeting

Trump-Zelenskyy meeting : रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षांहून अधिक काळ उलटला तरी संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या ठिकाणांवर सातत्याने ड्रोन आणि लांब पल्ल्याचे हल्ले सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर भेट होणार आहे. युद्धविराम आणि राजनैतिक चर्चेला पुन्हा गती देण्याच्या दृष्टीने या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

न्यूयॉर्कमध्ये होणार महत्त्वाची चर्चा

झेलेन्स्की यांनी रविवारी ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर दोन्ही नेते न्यूयॉर्कमध्ये भेटणार असल्याचे जाहीर केले. ही बैठक अनेक बाबतीत महत्त्वाची ठरू शकते, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. तसेच, युद्धाचा राजनैतिक तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना पुन्हा गती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. संयुक्त राष्ट्रांची ८१वी महासभा सुरू असताना ही भेट होत आहे. जगभरातील नेते न्यूयॉर्कमध्ये दाखल होत असून, रशिया-युक्रेन युद्ध हा महासभेतील प्रमुख चर्चेचा विषय राहण्याची शक्यता आहे.

युद्धविरामासाठी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

झेलेन्स्की यांच्या मते, युक्रेनची प्राथमिकता शांतता प्रस्थापित करण्याची आहे. ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि मानवी जीवांचे संरक्षण यांसारख्या मूलभूत मुद्द्यांवर तणाव कमी करण्यासाठी काही प्रस्तावांवर अमेरिका आणि युक्रेनकडून काम सुरू आहे. या दिशेने ठोस पावले उचलण्याची तयारी असल्याचेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. यापूर्वी झेलेन्स्की यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये राजनैतिक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची गरज व्यक्त केली होती. अमेरिका-युक्रेन-रशिया यांच्यात भविष्यात त्रिपक्षीय चर्चा होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती; मात्र त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

रशियन तेल रिफायनरीवरील हल्ल्यांचा मुद्दा 

दरम्यान, ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील फोनवरील चर्चेत रशियातील तेल रिफायनऱ्यांवर युक्रेनकडून होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दाही उपस्थित झाला. Axiosच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना हे हल्ले थांबवण्याचे वारंवार आवाहन केले. या हल्ल्यांचा इंधन पुरवठ्यावर आणि डिझेलच्या किमतीवर परिणाम होत असल्याचे अमेरिकेच्या बाजूने सांगितले जात आहे. युक्रेन मात्र रशियाच्या ऊर्जा आणि लष्करी पायाभूत सुविधांवर दबाव निर्माण करण्यासाठी अशा हल्ल्यांचा वापर करत आहे. त्यामुळे हा मुद्दा आगामी चर्चेत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

युद्धभूमीवर संघर्ष कायम

एकीकडे राजनैतिक चर्चेचे प्रयत्न सुरू असतानाच युद्धभूमीवरील परिस्थिती मात्र अधिक तीव्र होत आहे. २० सप्टेंबर रोजी युक्रेनने रशियावर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले. त्यानंतर रशियानेही युक्रेनविरोधातील हल्ले वाढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे न्यूयॉर्कमधील ट्रम्प-झेलेन्स्की भेटीत तातडीचा युद्धविराम, ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले, सुरक्षा हमी आणि पुढील राजनैतिक चर्चेची रूपरेषा यांसारखे मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात. मात्र, या बैठकीतच रशिया-युक्रेन युद्धाचा अंतिम तोडगा निघेल का, हे सध्या निश्चितपणे सांगता येत नाही.

हेही पाहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.