Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरण सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणातील कायदेशीर घडामोडींना आता वेग आला असून, या प्रकरणी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन हे शनिवार 19 सप्टेंबरला, दुपारी 4 वाजता थेट ‘मातोश्री’वर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सतीश यांनी यामागील आपली भूमिका स्पष्ट केली असून, यामुळे समाजमाध्यमांसह विविध स्तरांतून चर्चांना उधाण आले आहे.
दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून नव्या घडामोडी समोर येत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेकडून या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण मिळालं आहे.
हेही वाचा: Pune Crime : पुण्यातील हॉटेलमध्ये देहविक्रीचे रॅकेट उघड; पोलिसांनी सापळा रचत केला पर्दाफाश
सतीश सालियन यांचा दावा काय?
सतीश सालियन यांनी, आपल्याकडे आदित्य ठाकरेंविरोधात पुरेसे आणि ठोस पुरावे असल्याचा दावा केला आहे. कायदेशीर हक्कांचा वापर करून न्यायाची मागणी करणे हा आपला अधिकार असल्याचे सांगत, या कायदेशीर प्रक्रियेला राजकीय कट-कारस्थान म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी सुरू असलेल्या कायदेशीर कार्यवाहीसोबतच आता ही नवी मानहानीची नोटीस बजावण्यात येत असल्याचेही सतीश यांनी स्पष्ट केले आहे.
आदित्य ठाकरेंची भूमिका स्पष्ट
या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी दिशा सालियन यांना आपण कधीही भेटलो नसल्याचंही म्हटलं आहे. त्यांच्या मते, या प्रकरणात आपलं नाव जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे सतीश सालियन यांची पुढील भूमिका आणि ‘मातोश्री’वरील संभाव्य भेट याकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात विविध दावे, आरोप आणि त्यावर संबंधितांकडून दिली जाणारी स्पष्टीकरणं यामुळे वातावरण तापलं आहे. सध्या तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने या प्रकरणातील आरोपांची अंतिम सत्यता तपास यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: Semicon India 2026 : ‘चिप’ निर्मितीच्या जगात भारताची दमदार एन्ट्री; काय आहे भारताचा मास्टरप्लॅन
पोलीसांकडे सुरक्षेची मागणी
मातोश्रीवर नोटीस बजावण्यासाठी जात असताना अडथळा निर्माण होण्याची, धमकी मिळण्याची किंवा शारीरिक इजा होण्याची शक्यता सतीश सालियन यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून स्वतःसह आपल्या कायदेशीर टीमला पुरेसे पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ‘मातोश्री’ परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी आणि नोटीस बजावण्याची प्रक्रिया शांततेत पार पडावी, अशी विनंतीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि तपास यापुढेही पूर्ण ताकदीने सुरू ठेवणार असल्याचे सतीश सालियन यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सतीश सालियन यांचा ‘मातोश्री’ दौरा या प्रकरणातील पुढील महत्त्वाची घडामोड ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community

