India Pakistan Border : स्वातंत्र्यदिनापूर्वी भारत-पाक सीमेवर खळबळ; जवानांनी उधळला पाकिस्तानचा कट

राजस्थान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर, सीमावर्ती भागात विशेष शोधमोहीम राबवण्यात आली

121
India-Pakistan border security operation with seized drugs and weapons.
राजस्थानच्या भारत-पाक सीमेवर धडक कारवाई

India Pakistan Border Bikaner : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानमधून ड्रोनच्या माध्यमातून भारतात पाठवण्यात आलेला अमली पदार्थ आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. बीकानेर जिल्ह्यातील खाजूवाला सेक्टरमध्ये राजस्थान पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सुमारे 10 किलो ‘999 मार्का’ अफगाण हेरॉईन, 11 विदेशी बनावटीची पिस्तुले, 22 मॅगझिन आणि 100 हून अधिक जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. जप्त हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 50 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

राजस्थान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर, सीमावर्ती भागात विशेष शोधमोहीम राबवण्यात आली होती. तपासादरम्यान ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानातून भारतीय हद्दीत टाकण्यात आलेला हा साठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्या माध्यमातून संपूर्ण तस्करीच्या जाळ्याचा तपास सुरू आहे. या नेटवर्कमध्ये भारतातील स्थानिक साथीदारांचा सहभाग आहे का, याचाही शोध तपास यंत्रणा घेत आहेत. (India Pakistan Border)

हेही वाचा: ‘कोकणात नेमकं काय शिजतंय?’ Uday Samant यांच्या प्रभावक्षेत्रात भाजपच्या वाढत्या हालचालींनी रंगल्या चर्चा

गेल्या काही वर्षांत राजस्थान आणि पंजाब सीमेवर ड्रोनद्वारे हेरॉईन, शस्त्रे आणि दारुगोळा पाठवण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे सीमा सुरक्षा दल (BSF), राज्य पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांनी अशा हालचालींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ड्रोनच्या माध्यमातून होणारी तस्करी ही सीमाभागातील सुरक्षेसाठी मोठे आव्हान मानली जात आहे.

यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बीकानेर दौऱ्यादरम्यान सीमाभागात ड्रोनद्वारे होणारी तस्करी रोखण्यासाठी अत्याधुनिक अँटी-ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यावर भर दिला होता. ड्रोन भारतीय हद्दीत उतरल्यावर त्याचा माल स्वीकारणाऱ्या स्थानिक नेटवर्कवर कारवाई करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. (India Pakistan Border)

हेही वाचा: D.Y. Patil Passes away : पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांचे निधन; 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्वातंत्र्यदिन जवळ आल्यामुळे राजस्थानसह संपूर्ण पश्चिम सीमाभागात सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. बीएसएफ, स्थानिक पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा संयुक्तपणे संवेदनशील भागांवर लक्ष ठेवून आहेत. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी रोखण्यात यश आल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे.

हेही पाहा: 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.