पुतणी Nila Vikhe Patil स्वीडनमध्ये खासदार झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांची खास पोस्ट; म्हणाले…

पुतणी Nila Vikhe Patil स्वीडनमध्ये खासदार झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांची खास पोस्ट; म्हणाले...

17
Nila Vikhe Patil Sweden MP
Nila Vikhe Patil Sweden MP

Nila Vikhe Patil Sweden MP  : महाराष्ट्रातील विखे पाटील कुटुंबाची राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील परंपरा आता स्वीडनपर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आणि शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत निवड झाली आहे. १३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या स्वीडनच्या राष्ट्रीय निवडणुकीत त्यांनी स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून विजय मिळवला. ४१ वर्षीय नीला आता स्वीडनच्या ३४९ सदस्यीय संसदेत, म्हणजेच ‘रिक्सदाग’मध्ये खासदार म्हणून काम करतील.

नीला विखे पाटील या स्वीडनच्या ग्रीन पार्टीशी संबंधित आहेत. निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी आनंद व्यक्त करताना, ३४९ सदस्यांच्या संसदेत सहभागी होणे हा आपल्यासाठी महत्त्वाचा अनुभव असल्याचे सांगितले. शहर आणि देशासाठी योगदान देण्यास आपण उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

‘ज्यांना मतदान करता येत नाही, त्यांचा आवाज बनायचंय’

खासदार म्हणून आपल्या प्राधान्यक्रमांबाबत बोलताना नीला यांनी मुलांचे कल्याण आणि पर्यावरण या विषयांवर विशेष लक्ष देण्याची भूमिका व्यक्त केली आहे. मतदानाचा अधिकार नसलेल्या मुलांचा आणि तरुणांचा आवाज संसदेत मांडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक मुलाला चांगल्या भविष्यासाठी संधी मिळेल, असा समाज निर्माण करण्यासाठी काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ पाणी, निसर्गाचे संरक्षण आणि राहण्यायोग्य ग्रह यांनाही त्यांनी महत्त्व दिले आहे.

अहिल्यानगर ते स्वीडनचा राजकीय प्रवास

नीला विखे पाटील यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला, तरी त्यांचे बालपण महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये गेले. त्यांचे वडील अशोक विखे पाटील हे शिक्षण क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व असून विखे पाटील फाउंडेशनशी संबंधित आहेत. नीला या माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत. विखे पाटील कुटुंबाचा महाराष्ट्रातील सहकार, शिक्षण आणि राजकारणाच्या क्षेत्रात दीर्घ इतिहास आहे. नीला यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्याच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

स्वीडिश राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय

नीला यांनी तरुण वयातच राजकारणात प्रवेश केला. त्या स्वीडनमधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. स्टेफान लोफवन यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम केले. या काळात वित्त, करप्रणाली आणि गृहनिर्माण यांसारख्या विषयांवर त्यांनी काम केले. यानंतर त्या स्टॉकहोम सिटी कौन्सिलवर निवडून आल्या. ग्रीन पार्टीच्या स्टॉकहोम युनिटसह पक्षाच्या विविध संघटनांमध्येही त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. उपलब्ध वृत्तांनुसार त्या ग्रीन पार्टीच्या स्टॉकहोम निवडणूक समितीशीही संबंधित राहिल्या आहेत.

अर्थशास्त्र, कायदा आणि एमबीएचे शिक्षण

नीला यांचे शिक्षण स्वीडन आणि स्पेनमध्ये झाले. त्यांनी गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले असून माद्रिदमधील कॉम्प्लुटेन्स विद्यापीठातून एमबीए केले आहे. त्यांना स्वीडिश, इंग्रजी आणि स्पॅनिश भाषा अवगत आहेत.

‘भारताशी माझं नातं कायम आहे’

स्वीडनमध्ये राजकीय कारकीर्द घडवत असतानाही भारताशी असलेले आपले नाते कायम असल्याचे नीला यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राबद्दल आणि भारताबद्दल आपल्याला विशेष आपुलकी असल्याचे त्यांनी सांगितले. आपले आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दलच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. आपण १५ वर्षांच्या असताना त्यांनी आपल्याला राज्याचा अर्थसंकल्प वाचायला लावला होता, असे नीला यांनी सांगितले. त्यांच्या आजोबांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात दर आठवड्याला फोन केल्याची आठवणही त्यांनी व्यक्त केली.

राधाकृष्ण विखे पाटलांची खास पोस्ट

राधाकृष्ण विखे पाटील यांनी नीला यांच्यासाठी अभिनंदनाची पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणाले, “माझी पुतणी नीला विखे पाटील हिची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून झालेली निवड ही आमच्या संपूर्ण परिवारासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तिने मिळविलेले हे यश तिच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि स्वीडनमधील सार्वजनिक जीवनातील योगदानाची पावती आहे.” ते पुढे म्हणाले, “नीला सुरुवातीपासूनच सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय राहिली आहे. स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणूनही तिने जबाबदारी पार पाडली आहे. माझे बंधू अशोक पाटील यांनी मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेली मेहनत या यशामागे महत्त्वाचे आहेत. नीला आता स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून तेथील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेल, याचा मनापासून आनंद आहे”, असं म्हणत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.