
Pune Municipality: देशभरात आगीच्या घटना वाढत असताना पुणे शहरातील पीजी, हॉस्टेल, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि इतर आस्थापनांच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा बनला आहे. पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार अग्निशमन विभागाने शहरात ‘फायर ऑडिट’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत लोहगाव आणि निंबाळकरनगर परिसरातील पीजी व हॉस्टेलची तपासणी करण्यात आली. यात अग्निसुरक्षेची कोणतीही यंत्रणा नसलेल्या आणि आवश्यक परवानग्या नसलेल्या ११ पीजी व हॉस्टेलवर सीलची कारवाई करण्यात आली.
अग्निशमन प्रमुख गणेश सोनुने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यात सुमारे दहा पीजी व हॉस्टेलची पाहणी करण्यात आली. तपासणीत असे दिसून आले की, तीन ते चार मजली इमारतींमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राहत होते. मात्र, आग लागल्यास बचावासाठी आवश्यक असलेली कायमस्वरूपी किंवा तात्पुरती अग्निशमन यंत्रणा या इमारतींमध्ये नव्हती.
तपासणीदरम्यान संबंधित इमारतींना आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांचीही तपासणी करण्यात आली. यात बिल्डिंग परमिशन, ड्रेनेज, पाणीपुरवठा, वृक्ष, स्ट्रक्चरल, कर विभाग आणि अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) यापैकी अनेक परवानग्या उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे केवळ अग्निसुरक्षेचाच नव्हे, तर या आस्थापनांच्या अधिकृततेबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा – Asian Games 2026 : भारतीय महिला संघ बांगलादेशला पराभूत करत अंतिम फेरीत; शेफाली वर्माची शतकी खेळी
तपासणी करताना विद्यार्थ्यांशी बोलल्यावर प्रशासनाला एक महत्त्वाची माहिती मिळाली. परिसरातील काही महाविद्यालये विद्यार्थ्यांना या पीजी व हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी सांगत होती. त्यामुळे आयुक्त नवलकिशोर राम यांनी अनधिकृत आणि विनापरवाना निवासव्यवस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या संबंधित व्यक्तींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जागामालकांसह संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या अनधिकृत पीजी व हॉस्टेलवर कारवाईची मोहीम यापुढेही सुरू राहील. अग्निशमन विभागासोबत महापालिका बांधकाम आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारीही या कारवाईत सहभागी आहेत. शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, पीजी, हॉस्टेल आणि इतर आस्थापनांचीही तपासणी केली जाईल. अग्निशमन यंत्रणा नसणे किंवा ती व्यवस्थित काम करत नसल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. महापालिका प्रशासनाने सर्व आस्थापनांना त्यांच्या अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत आणि चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन केले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
