D.Y. Patil Passes away : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. डी. वाय. (ज्ञानदेव यशवंतराव) पाटील यांचे आज कोल्हापुरात निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रासह देशभरात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणी अनेक शैक्षणिक संस्था, वैद्यकीय महाविद्यालये, विद्यापीठे आणि रुग्णालयांची उभारणी झाली. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना १९९१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. (D.Y. Patil Passes away)
हेही वाचा: Mumbai Disease : मुंबईकरांनो सावधान! शहरात मलेरिया, ड्येंगूचे थैमान; रुग्णांची आकडेवारी चिंताजनक
राजकीय कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर ते त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही कार्यरत होते. शिक्षणाचा प्रसार, आरोग्यसेवा आणि सामाजिक विकासासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांची देशभरात स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. (D.Y. Patil Passes away)
कौटुंबिक पार्श्वभूमी
डी. वाय. पाटील यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप या शेतीप्रधान आणि ग्रामीण वातावरण असलेल्या गावात झाला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पाटील यांनी जिद्द, मेहनत आणि दूरदृष्टीच्या बळावर शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, या ध्येयाने त्यांनी शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान दिले आणि देशभरात शैक्षणिक संस्थांचे विस्तृत जाळे उभारले.
त्यांच्या कुटुंबालाही राजकीय आणि सामाजिक कार्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. त्यांचे पुत्र सतेज (बंटी) पाटील हे महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री असून राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. दुसरे पुत्र डॉ. संजय डी. पाटील यांनीही शिक्षण आणि समाजकारणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. तसेच त्यांचे नातू ऋतुराज पाटील हेही सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत. (D.Y. Patil Passes away)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community


