
-
ऋजुता लुकतुके
GST Collection News : देशाच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसुलात जुलै महिन्यात मोठी वाढ नोंदवली गेली असून, एकूण जीएसटी वसुली १५.४ टक्क्यांनी वाढून २.११ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील ही सर्वात मजबूत मासिक कामगिरींपैकी एक मानली जात आहे. देशांतर्गत व्यवहारांमधील वाढ आणि आयातीवरील कर महसुलातील लक्षणीय वाढ यामुळे ही विक्रमी वसुली झाल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केले.
परतावे (रिफंड) वजा केल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल १५.८ टक्क्यांनी वाढून १.८१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे कर संकलनातील सातत्य आणि अर्थव्यवस्थेतील वाढती गती स्पष्ट होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जुलै महिन्यात देशांतर्गत जीएसटी महसूल १०.१ टक्क्यांनी वाढून १.४४ लाख कोटी रुपये झाला. त्याचवेळी आयातीवरील जीएसटी महसूल २८.८ टक्क्यांनी वाढून ६६,५११ कोटी रुपये झाला. आयातीवरील कर संकलनातील ही मोठी वाढ देशांतर्गत मागणी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील वाढते व्यवहार दर्शवते.
(हेही वाचा – Commonwealth Games 2026 : ‘अहमदाबादमधील क्रीडा सुविधा जागतिक दर्जाच्या असतील,’ – हर्ष संघवी )
या कालावधीत सरकारने २९,९६८ कोटी रुपयांचे परतावे जारी केले, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत १३.१ टक्के अधिक आहेत. परताव्यानंतरचा देशांतर्गत निव्वळ जीएसटी महसूल १०.५ टक्क्यांनी वाढून १.२७ लाख कोटी रुपये झाला, तर आयातीवरील निव्वळ महसूल ३०.३ टक्क्यांनी वाढून ५४,२२३ कोटी रुपये झाला.
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जुलै या पहिल्या चार महिन्यांत एकूण जीएसटी वसुली १०.१ टक्क्यांनी वाढून ८.४२ लाख कोटी रुपये झाली आहे. याच कालावधीत निव्वळ जीएसटी महसूल ९.२ टक्क्यांनी वाढून ७.२१ लाख कोटी रुपये झाला. देशांतर्गत महसूल ४.५ टक्क्यांनी वाढून ५.९९ लाख कोटी रुपये, तर आयातीवरील महसूल २६.९ टक्क्यांनी वाढून २.४३ लाख कोटी रुपये झाला.
तज्ज्ञांच्या मते, जुलै महिन्यातील जीएसटी वसुलीतील वाढ देशातील मजबूत आर्थिक हालचाली, सुधारलेले कर पालन (कॉम्प्लायन्स) आणि वाढता कर आधार यांचे संकेत देते. आगामी महिन्यांमध्येही महसूल वाढीचा हा कल कायम राहिल्यास केंद्र आणि राज्य सरकारांच्या आर्थिक स्थितीला बळकटी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
