Maharashtra : पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटणार? महायुतीतील नव्या घडामोडींमुळे उत्सुकता

Maharashtra : पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटणार? महायुतीतील नव्या घडामोडींमुळे उत्सुकता

95
Maharashtra : पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटणार? महायुतीतील नव्या घडामोडींमुळे उत्सुकता
Maharashtra : पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटणार? महायुतीतील नव्या घडामोडींमुळे उत्सुकता
प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिन जवळ आला की राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पालकमंत्रिपदाचा प्रश्न पुन्हा चर्चेत येतो. यंदाही नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांतील पालकमंत्रिपदाचा तिढा महायुतीसाठी डोकेदुखी ठरत असून, दोन्ही ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला आहे. दीड वर्षांपासून रखडलेल्या या निर्णयामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेली चुरस आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे.

नाशिकमध्ये खराब रस्ते आणि वाढलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून महायुतीतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेकडून शहरात ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ फलक झळकले आहेत. “रस्त्यांवरील खड्डे बुजवायचे असतील तर छगन भुजबळांना नाशिकचे पालकमंत्री करा,” असा मजकूर असलेल्या या फलकांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही पालकमंत्रिपदासाठीची रस्सीखेच कायम आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यातील राजकीय स्पर्धा अद्याप कायम असून, या पदासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, माणगाव येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. “पालकमंत्रिपदाची केवळ घोषणा बाकी असून तीही लवकरच होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या दाव्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे.

(हेही वाचा – Pune : भररस्त्यात आरोपीची धिंड काढणे पोलिसांना पडले महागात; मानवधिकारातंर्गत मोठा दणका )

याच कार्यक्रमातील आणखी एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले. पक्ष नेतृत्वाकडून आदेश मिळाल्यास आपण मंत्रिपद सोडण्यासही तयार असल्याचे गोगावले यांनी म्हटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली.

या विधानावर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपद आणि जबाबदाऱ्यांबाबत अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष घेत असतात, असे स्पष्ट केले. तर शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा व्हिडिओ जुना असल्याचे सांगत, तो दोन-तीन महिन्यांपूर्वीच्या कार्यक्रमातील असल्याचे स्पष्ट केले.

राजकीय सूत्रांच्या मते, विधान परिषद निवडणुकीनंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची शक्यता वाढली आहे. हे पद शिवसेनेकडे जाण्याची चर्चा असून त्यामुळे भरत गोगावले यांच्या अपेक्षांना नव्याने बळ मिळाले आहे. मात्र, मंत्रिपद सोडण्याच्या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर निर्माण झालेल्या संभ्रमामुळे पुढील निर्णयाकडे आता महायुतीतील नेते आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्रिपदाचा प्रश्न केवळ प्रशासकीय न राहता महायुतीतील राजकीय समतोलाचा विषय बनला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत होणारा निर्णय अनेक राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.