Uddhav thackeray : उबाठा शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना आणि मतदारांना उद्देशून भावनिक आव्हान केले. पक्षाच्या नेतृत्वावर कोणाचा विश्वास उरला नसेल, तर त्यांनी पर्यायी नेतृत्वाची निवड करावी, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे
अलीकडच्या काळात शिवसेना (उबाठा) गटातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या वृत्तांमुळे पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा: Eknath Shinde : ‘हा फक्त ट्रेलर आहे…’; शिंदेचा विरोधकांना टोला, ‘ऑपरेशन तुडवा’वरही जोरदार पलटवार
दरम्यान, काही खासदारांच्या संभाव्य बंडामुळे पक्षासमोर नवे आव्हान उभे राहिल्याची चर्चा आहे, ज्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे यांनी, आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे संकेत दिले. पक्षाचे भविष्य कार्यकर्ते आणि जनतेच्या विश्वासावर ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे यांनी आपल्या भाषणात पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून विचार आणि संघर्षाची परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. पक्ष अडचणीच्या काळातून जात असला तरी कार्यकर्त्यांच्या बळावर तो पुन्हा उभारी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे, ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीकेची धार अधिक तीव्र केली. “लोकशाहीत जनादेशाचा अपमान करून पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे,” असा थेट आरोप करत, त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांच्या बंडखोरीचा संदर्भ देत, त्यांनी थेट त्या मतदारसंघांतील मतदारांची जाहीर माफी मागितली. “जनतेने ज्यांच्यावर विश्वास टाकून निवडून दिले, त्यांनीच प्रतारणा केली,” असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
Join Our WhatsApp Community

