Eknath Shinde : ‘हा फक्त ट्रेलर आहे…’; शिंदेचा विरोधकांना टोला, ‘ऑपरेशन तुडवा’वरही जोरदार पलटवार

शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचे विरोधकांवर टीकास्त्र

75
Eknath Shinde addressing a crowd at a political event.
Eknath Shinde delivers a powerful speech at the Shiv Sena event.

Eknath Shinde : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या संभाव्य बंडाच्या चर्चांनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, केलेल्या एका सूचक वक्तव्याने, राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. चालू घडामोडींवर भाष्य करताना शिंदे यांनी “हा फक्त ट्रेलर आहे, पुढचा सिनेमा अजून बाकी आहे” अशा आशयाचे वक्तव्य करत विरोधकांवर निशाणा साधला. नेस्को सेंटर, गोरेगाव येथे आयोजित शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

शिवसेना (उद्धव ठाकरे UBT) गटातील काही खासदार, शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या वक्तव्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. राजकीय वर्तुळात याचा अर्थ आगामी काळात आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असा काढला जात आहे.

हेही वाचा: महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘महिला स्टार्टअप हब’ स्थापन करणार – CM Devendra fadnavis 

यावेळी शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधत, “जनतेपासून दूर गेलेल्या नेतृत्वामुळे अनेक लोकप्रतिनिधी नाराज आहेत”, असा दावा त्यांनी केला. “विकासकामे आणि मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेशी समन्वय आवश्यक असतो”, असेही त्यांनी सूचित केले.

दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे) गटातील सहा खासदारांनी पक्षाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. या खासदारांनी पक्ष मूळ विचारसरणीपासून दूर गेल्याचा आरोप केल्याचे वृत्त आहे.

या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणि संभाव्य राजकीय फेरबदल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत या प्रकरणात नेमक्या कोणत्या हालचाली होतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष राहणार आहे.

‘ऑपरेशन तुडवा’वर शिंदेंचा पलटवार

​उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाच्या ‘ऑपरेशन तुडवा’ या आव्हानाचा समाचार घेताना, एकनाथ शिंदे यांनी दिलेले प्रत्युत्तर राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण करणारे ठरले आहे. “हिंमत असेल तर समोर या, आमचे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवणार नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी राऊत आणि ठाकरे गटाला उघड आव्हान दिले आहे.

​पक्षातील काही खासदारांच्या संभाव्य बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर, संजय राऊत यांनी बंडखोरांविरोधात ‘ऑपरेशन तुडवा’ राबवण्याचा इशारा दिला होता. या विधानावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “काही लोक लांडग्यांचे ऑपरेशन करण्याच्या गोष्टी करत आहेत, पण कंपाऊंडर कधी ऑपरेशन करू शकतो का? ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते. वाघाचे कातडे पांघरून कोणी वाघ होत नाही.” यावेळी त्यांनी स्वतःच्या संघर्षाचा उल्लेख करत, ४ वर्षांपूर्वी आपल्याला मिळालेल्या धमक्यांचा आणि आपण एकट्याने वरळीत जाऊन दिलेल्या आव्हानाचा दाखला दिला.

​ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना शिंदे म्हणाले, “सेनापतीने घरी बसून आदेश देऊन चालत नाही, तर समोर येऊन लढावे लागते. सकाळी खासदारांना शिव्या घालायच्या आणि संध्याकाळी त्यांनाच जवळ करायचे, ही दुटप्पी भूमिका आता जनता ओळखून आहे.” महायुतीच्या सरकारवर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी मुंबईकरांचे आभार मानले. कोस्टल रोड, मेट्रो आणि समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांमुळे मुंबईचा कायापालट होत असून, विकासकामांच्या जोरावरच जनतेने विरोधकांना नाकारल्याचा दावा त्यांनी केला.

​विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवर निशाणा साधताना, “कितीही शून्य एकत्र आले तरी त्यांची बेरीज शून्यच येते,” अशी बोचरी टिप्पणी करत त्यांनी आगामी काळात संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट केली आहेत. वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून शिंदेंनी दिलेल्या या आक्रमक आव्हानामुळे आता ठाकरे गट याला काय उत्तर देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.