-
विशेष प्रतिनिधी
मुंबईची (Mumbai) जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बेस्टच्या संपाची टांगती तलवार सध्या मुंबईकरांच्या चिंतेत भर घालत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी तातडीची बैठक घेऊन संपावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीत, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या संकटाच्या काळात मुंबईकरांचे होणारे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांना संपाचा निर्णय मागे घेण्याचे भावनिक आवाहन केले आहे. ते म्हणाले की, बेस्टवर (Best) दररोज सुमारे ३० लाख प्रवासी अवलंबून आहेत. संपामुळे नोकरदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे हाल होतील, याचा विचार करून कामगारांनी जनहिताला प्राधान्य द्यावे. शासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अत्यंत सकारात्मक असून, समन्वयाने मार्ग काढण्यासाठी कटिबद्ध आहे.
(हेही वाचा – Fuel Shortage : जनतेची ‘लूट’ थांबणार! इंधनाची साठेबाजी करणाऱ्यांवर केंद्र आणि राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर)
येत्या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करून या प्रश्नावर अंतिम तोडगा काढला जाईल, असे आश्वासनही मंत्री सरनाईक यांनी दिले. तत्पूर्वी, महाव्यवस्थापक स्तरावर मार्गी लावता येण्यासारख्या स्थानिक मागण्यांची पूर्तता आठवड्याभरात करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. चर्चेच्या माध्यमातून सर्व प्रश्न सुटू शकतात, असा विश्वास व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी संवादाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

