Screen Time Control : स्क्रीन टाइम पलीकडचं लहानग्यांचं जगणं!

11
Screen Time Control
Screen Time Control
  • डॉ. विश्वेश मालगी

Screen Time Control : “बस झालं आता, ठेव तो मोबाईल आणि थोडा वेळ बाहेर खेळ,” असे सांगण्याची वेळ आज अनेक पालकांवर आली आहे. पूर्वी शाळेतून घरी आल्यानंतर मित्रांसोबत खेळण्यासाठी मुलं आल्या आल्या लगेचच घराबाहेर पडायची; आता मात्र मोकळ्या वेळेत मोबाईलवरच्या रिल्स बघणे, गेम्स खेळणे, टीव्हीवर कार्टून पाहणे किंवा टॅबलेट हातात घेतला जातो. ऑनलाइन अभ्यास, कार्टून, गेम्स आणि व्हिडीओच्या माध्यमातून स्क्रीन टाइम वाढला असून तो रोजच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढत असून त्यांचा प्रत्यक्ष खेळण्याचा वेळ, शारीरिक हालचाल आणि मित्रांसोबतचा संवाद कमी होताना दिसत आहे. मुलांना केवळ मोबाईलपासून दूर ठेवण्यापेक्षा त्यांना मैदान, खेळ आणि सामाजिक उपक्रमांची गोडी पुन्हा लावणे ही सध्या पालक आणि शाळांसमोरील महत्त्वाची गरज बनली आहे.

पंतप्रधान मोदी यांनीही मुलांमधील वाढत्या स्क्रीन टाइमबद्दल चिंता व्यक्त करत शिक्षकांनी पालकांसोबत एकत्र येत या समस्येवर काम करण्याचे आवाहन केले आहे. केवळ मोबाईलचा वापर बंद करण्यापेक्षा त्याला पर्याय उपलब्ध करून देणे अधिक प्रभावी ठरू शकते. शिक्षण मंत्रालयाकडूनही ऑनलाइन शिक्षणाचा वापर संतुलित पद्धतीने करण्यावर भर दिला जातो. ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेताना मर्यादित स्क्रीन टाइम ठेवणे आणि त्यानंतर मुलांना मैदानी खेळ, वाचन, कला, संगीत किंवा इतर सर्जनशील उपक्रमांकडे वळवणे आवश्यक आहे.

(हेही वाचा – Ganeshotsav 2026 : अंजीर-मखाण्यापासून साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; अमरावतीत विशेष आकर्षण )

स्क्रीन टाइम वाढण्यामागची कारणे

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीत घर आणि नोकरी अशा तारेवरील कसरतीत पालक आपल्या मुलांना फारसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे थकुन भागून घरी आल्यानंतर मुलांना काही वेळ का असेना पण शांत ठेवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देणे हा अनेकदा सोपा पर्याय ठरतो. ऑनलाइन वर्ग, शैक्षणिक व्हिडीओ, मोबाईल गेम्स, सोशल मीडिया आणि मनोरंजनाची सहज उपलब्धता यामुळेही स्क्रीनचा वापर वाढतो. घरात मोकळी जागा किंवा घराजवळ सुरक्षित असे खेळाचे मैदान नसणे हेही एक कारण आहे. सतत स्क्रीनसमोर बसल्याने मुलांच्या शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी होते. डोळ्यांवर ताण, झोपेच्या वेळेत बदल, वजन वाढणे, चिडचिड, एकाग्रतेत अडथळे आणि प्रत्यक्ष संवाद कमी होणे अशा समस्या काही मुलांमध्ये दिसू शकतात.

शाळांमध्ये ‘डिजिटल डिटॉक्स’ची गरज

शाळांनी मुलांना डिजिटल साधनांपासून पूर्णपणे दूर ठेवण्याऐवजी त्यांचा योग्य वापर शिकवणे गरजेचे आहे. आठवड्यातून एखादा दिवस किंवा काही तास ‘नो-स्क्रीन अॅक्टिव्हिटी’ राबविण्यात आली पाहिजे. या वेळेत मैदानी खेळ, चित्रकला, हस्तकला, वाचन, सामूहिक खेळ, बागकाम किंवा संगीत यांसारखे उपक्रम घेता येतील. यामुळे मुलांना स्क्रीनशिवायही इतर गोष्टींमध्ये आनंद घेता येतो याची कल्पना येईल. यावर कृतीच्या स्तरावर शाळांनी अनेकविध उपक्रम राबवण्याची गरज आहे.

आजचे डिजिटल बालपण

पूर्वीचे बालपण आणि आजचे डिजिटल बालपण यामध्ये मोठा फरक आहे. विटीदांडू, लगोरी, भोंडला, गोट्या, लपाछपी यांसारख्या खेळांत मुलं धावत, पडत, पुन्हा उठत आणि मित्रांसोबत खेळाची नियमावली ठरवत असत, यातून मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक असा सर्वांगिण विकास होत असे. आज क्रिकेट किंवा कबड्डीच्या मैदानाऐवजी अनेक मुलांना मोबाइल गेममध्येच स्पर्धा करायला आवडू लागली आहे. या मानसिकतेपासून त्यांना दूर करणे आवश्यक आहे. यासाठी केवळ स्क्रीन पूर्णपणे बंद करण्यापेक्षा ‘स्क्रीनला पर्याय’ निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. तसेच आवश्यकतेनुसार, मुलांच्या सर्वोत्तम विकारासासाठी तज्ज्ञ अथवा आवश्यकतेनुसार समुपदेकांचे मार्गदर्शन घेणेही आवश्यक ठरेल. यासाठी ‘स्क्रीन’ पूर्णपणे बंद करण्यापेक्षा ‘स्क्रीन’ला पर्याय निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांसोबत स्वत: मैदानावर जाणे, शाळांनी नियमित विविध छंद, उपक्रम हाती घेणे, सोसायटीमध्ये मुलांचे कलागुण वाढीस लागतील यासाठी सुरक्षित जागा त्यांना उपलब्ध करून द्यावी. मुलांचं बालपण जपत त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे, हे आज काळाची गरज बनत आहे. आजच्या काळात मुलांना मोबाईलपासून पूर्णपणे दूर ठेवणे शक्य नाही, कारण ऑनलाइन अभ्यास, शैक्षणिक व्हिडीओ आणि इतर कारणांसाठीही स्क्रीनचा वापर केला जातो. मात्र या वापरानंतरही जेव्हा मुलांचा बराच वेळ मोबाईल किंवा टीव्हीसमोर जात असेल, तर त्यांच्या भवितव्यासाठी हा चिंतेचा विषय नक्कीच आहे. अनेकदा मुलं झोपण्यापूर्वीही स्क्रीनचा वापर करतात त्यामुळे त्यांची झोपेची वेळ बदलते आणि दिवसभरातील शारीरिक हालचाल कमी होते.

पालकांनी केवळ ‘आता मोबाईल वापरूच नको’ असे सांगण्याऐवजी स्क्रीन वापरण्याची ठराविक वेळ ठेवावी. शाळांनीही आठवड्यातील काही तास मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवून त्याऐवजी त्यांना वाचन, चित्रकला, खेळ इत्यादी उपक्रमात सहभाग कसा वाढेल, हे पाहावे. तसेच राबवलेल्या उपक्रमाविषयी मुलांचे अनुभवही जाणून घ्यावेत, जेणेकरून त्यांचं ‘स्क्रिन टाइम’पलीकडचं जग कसं आहे, हे लक्षात येईल.

(नेत्ररोग विभाग, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, मुंबई.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.