-
नमिता वारणकर
Screen Time Control मुलांमध्ये वाढत चाललेला स्क्रीन टाइम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चिंतेचा विषय ठरत असून त्यांना मोबाईल आणि इतर डिजिटल उपकरणांपासून काही काळ दूर ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना विविध मैदानी खेळ, व्यायाम आणि शारीरिक कसरतींकडे वळवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे. शिक्षणाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक हालचाल आणि खेळांना महत्त्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. म्हणून मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ नियंत्रित करून त्यांना सक्रीय, निरोगी आणि खेळकर जीवनशैलीकडे नेण्याची जबाबदारी शिक्षकांसह पालकांचीही असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकारनेही धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. (Screen Time Control)
या धोरणात्मक निर्णयासाठी किमान पूर्व प्राथमिक आणि सहा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी शाळांमध्ये डिजिटल गॅझेटच्या वापरावर सरकारने बंदी घालण्याची वेळ आता वेळ आली आहे. कारण १५ वर्षांपासून अनेक पालकांना मुलांसाठी नो स्क्रीन, नो मोबाईल, नो गॅझेट्स असा सल्ला देत आहे. स्क्रीन टाइमच्या दुष्परिणामांबाबत आता जागतिक पातळीवर जागरुकता वाढत असून अनेक देशांनी मुलांच्या स्क्रीन टाइम आणि सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. भारतानेही या विषयाकडे गांभीर्याने पाहून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. (Screen Time Control)
(हेही वाचा – Pune Airport वर प्रवाशांचा प्रवास सुखकर; एरोमॉलसाठी आठ गोल्फ कार्ट दाखल)
मानवी संवाद महत्त्वाचा…
पालक आणि शिक्षकांना फक्त दोष देऊन हा प्रश्न सुटणार नाही, तर शाळांमध्येच अनावश्यक डिजिटल साधनांचा वापर होत आहे का, याकडे लक्ष देणे आणि त्याबाबत स्पष्ट नियमावली तयार करणे आवश्यक आहे. लहान मुलांसाठी मानवी संवाद अर्थात त्यांच्याशी बोलणे, गप्पा मारणे खूप महत्त्वाचे आहे. सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या मेंदूच्या विकासात प्रत्यक्ष मानवी संवाद, सामाजिक सहभाग आणि भावनिक देवाणघेवाण यांना महत्त्व देणे आवश्यक आहे.
इतर मुलांशी कसे वागायचे-बोलायचे?
स्वत:च्या भावना कशा व्यक्त करायच्या?
सामाजिक परिस्थितीनुसार वर्तन कसे करायचे ?
स्व-नियंत्रण कसे विकसित करायचे? ही कौशल्ये प्रत्यक्ष मानवी संवादातून म्हणजे त्यांच्याशी बोलल्यानेच विकसित होतात. (Screen Time Control)
वाढत्या ‘स्क्रीन टाइम’मुळे काय होऊ शकते?
पाच वर्षांखालील मुलांमध्ये स्क्रीन टाइममुळे सामाजिक संवाद, भावनिक विकास, स्व-नियंत्रण आणि वर्तनाशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात. ५ ते १२ वर्षांच्या मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या, शारीरिक हालचालींचा अभाव आणि स्थूलतेचा धोका वाढू लागला आहे. गेमिंग आणि अनुचित ऑनलाइन सामग्रीच्या संपर्काची शक्यता वाढल्याने यातून नव्या समस्या उदभवू शकतात. १२ ते १८ वयाच्या किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया, ऑनलाइन मान्यता मिळवण्याची इच्छा, ‘लाइक’ची अपेक्षा, अवास्तव जीवनशैलीचे अनुकरण, गेमिंग तसेच इंटरनेटवरील धोकादायक सामग्रीचा प्रभाव वाढू शकतो. (Screen Time Control)
(हेही वाचा – Ganeshotsav 2026 : अंजीर-मखाण्यापासून साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; अमरावतीत विशेष आकर्षण)
शिक्षण मंत्रालयाने सांगितलेले नियम
- पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ३० मिनिटांपेक्षा अधिक स्क्रीन टाइमवरून संवाद नको.
- इयत्ता पहिली ते आठवीसाठी ऑनलाइन वर्ग साधारण ३० ते ४५ मिनिटांच्या दोन सत्रांपुरते वापरावे.
- इयत्ता ९वी ते १२वीसाठी ३० ते ४५ मिनिटांच्या ४ सत्रांपर्यंत ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे.
- शाळांमध्ये डिजिटल साधनांचा वापर सावधपणे करण्याचे, इंटरनेटचा वापर प्रौढांच्या देखरेखीखाली ठेवण्याचे आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या विचलनाची जाणीव शिक्षकांनी ठेवण्याचे निर्देशही शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत. (Screen Time Control)
तज्ज्ञ काय म्हणतात?
दोन वर्षांच्या मुलांपर्यंत मोबाईलचा वापर टाळावा. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी दोन तासांपेक्षा जास्त स्क्रीन टाइम नसावा. सतत मोबाईल, टीव्ही पाहिल्यामुळे त्यांचा मैदानी खेळाकडे कल कमी होतो, ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होतो. लहान मुलांना स्थूलपणा येऊ शकतो. ज्याचा परिणाम भविष्यात त्यांना मधुमेह, रक्तदाब यासारखे त्रास होऊ शकतात. पालकांनी स्वत: स्क्रीन टाइम प्रथम कमी करावा, कारण मुले पालकांचेच अनुकरण करतात. मुलांसाठी रोजचा दिनक्रम तयार करा. जेवताना किंवा झोपताना स्क्रीनचा वापर करू नये. जेवताना घरातील सर्व सदस्यांनी एकत्र जेवावे. एकमेकांशी संवाद साधावा. त्यामुळे मुलांची त्याची सवय लागेल. ‘स्क्रीन’चा वापर करतानादेखील काळजी घ्यावी. ती डोळ्यापासून योग्य अंतरावर असावी. दर अर्ध्या तासानंतर डोळ्यांना विश्रांती द्यावी. मोबाईल पाहताना प्रकाश कमी करावा जेणेकरून प्रकाशाचा परिणाम डोळ्यांवर होणार नाही. ‘स्क्रीन’ ही जरी काळाची गरज असली तरी त्यावर नियंत्रण असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सर्व देशांमध्ये असा धोरणात्मक निर्णय युद्धपातळीवर घेण्याची नितांत गरज आहे. योग्य मर्यादा आणि योग्य मार्गदर्शनाने ‘स्क्रीन’चा वापर केला तर मुलांचा सर्वांगीण विकास नक्कीच होईल, असे मत पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयाच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. स्मिता सांगडे यांनी व्यक्त केले आहे. (Screen Time Control)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

