NEET पुनर्परीक्षेपूर्वी सरकारची मोठी कारवाई; २२ जूनपर्यंत टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर बंदी, जाणून घ्या कारण

'पेपर लीक'च्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे

133
Telegram logo with a prohibition sign
The government has imposed a temporary ban on Telegram.

NEET Telegram ban : केंद्र सरकारने २१ जून रोजी होणाऱ्या NEET-UG पुन:परीक्षेच्या पार्श्वभूमीवर, एक मोठा निर्णय घेतल आहे. नीट परीक्षा सुरक्षित आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी यासाठी, केंद्र सरकारने भारतातील टेलिग्राम (Telegram) प्लॅटफॉर्मवर २२ जूनपर्यंत तात्पुरती बंदी घातली आहे. संघटित कॉपी बहाद्दर आणि सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांकडून विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक तसेच ‘पेपर लीक’च्या (NEET paper leak) गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

मेसेज एडिटिंग फीचरवरही बंदी; एनटीएचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) दिलेल्या माहितीनुसार, भारतातील टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर मर्यादित कालावधीसाठी बंदी घालण्यासोबतच, त्याच्या मेसेज एडिटिंग (संदेश संपादन) फीचरवरही रोख लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनटीएने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘माहिती तंत्रज्ञान कायदा, २०००’ च्या कलम ६९A (Section 69A of IT Act) अंतर्गत मिळालेल्या निर्देशांनुसार, भारतातील टेलिग्रामची सेवा २२ जूनपर्यंत मर्यादित राहील. याशिवाय, या प्लॅटफॉर्मला ३० जूनपर्यंत भारतातील आधीच पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये बदल करण्याची (एडिटिंग) सुविधा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एनटीएच्या म्हणण्यानुसार, टेलिग्रामच्या मेसेज एडिटिंग फीचरचा गैरवापर करून काही प्रकरणांमध्ये परीक्षा संपल्यानंतर मूळ प्रश्नपत्रिका जुन्या मेसेजमध्ये एडिट करून जोडली गेली. यामुळे प्रश्नपत्रिका आधीच लीक झाली असल्याचा खोटा पुरावा तयार केला जात होता. अशा प्रकारचा बनावट मजकूर तयार होण्याची शक्यता पूर्णपणे नष्ट करण्यासाठीच मंत्रालयाने हे कठोर निर्देश जारी केले आहेत.

हेही वाचा: Mumbai water crisis : मुंबईकरांनो सावधान! धरणांमधील पाणी पातळी चिंताजनक; पाणी कपातीबाबत पालिकेचा काय निर्णय?

सायबर गुन्हे शाखेची मोठी कारवाई

केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ (I4C), विविध राज्यांचे पोलीस दल आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) गेल्या काही आठवड्यांपासून टेलिग्रामवरील सक्रिय बनावट चॅनेल्स, ग्रुप्स आणि बॉट्सविरुद्ध सातत्याने कारवाई करत आहेत. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्याच्या बहाण्याने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून हजारो ते लाखो रुपयांची मागणी करणारे अनेक टेलिग्राम चॅनेल्स आतापर्यंत ब्लॉक करण्यात आले आहेत.

या कारवाईदरम्यान, बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जारी केलेला जाहीर इशारा आणि अहमदाबाद सायबर क्राईम शाखेच्या कारवाईचाही उल्लेख करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये टेलिग्रामवरील आठ चॅनेल्स चालवणाऱ्या एका आंतरराज्यीय सायबर ठग टोळीच्या सदस्यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून सुमारे १.५ कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार आणि एका महिन्यात जवळपास एक हजार मोबाईल नंबरशी संपर्क साधल्याचे पुरावे मिळाले आहेत.

एनटीएचे विद्यार्थी आणि पालकांना आवाहन

टेलिग्रामचा वापर करणाऱ्या लाखो वैध युजर्सना यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल एनटीएने खेद व्यक्त केला आहे. मात्र, हा निर्णय केवळ परीक्षा कालावधीपुरता मर्यादित असून परीक्षेची सुरक्षा सुनिश्चित करणे हाच याचा मुख्य उद्देश आहे. ‘नीट युजी २०२६’ ची पुनर्परीक्षा २१ जून रोजी नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही अपुष्ट किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ एनटीएच्या अधिकृत वेबसाइट तसेच पडताळणी केलेल्या सोशल मीडिया माध्यमांवरूनच माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन फसवणुकीची माहिती राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन १९३० किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलवर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: नागपुरात ‘Love Jihad’चा संतापजनक प्रकार; जवानाच्या पत्नीवर अत्याचार करत जबरदस्तीने केला धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.