Kokan Bazar : मराठी स्टार्टअप्ससाठी संधींचे व्यासपीठ ठरली, ‘कोकण बाजार STARTUP जत्रा 2026’; उद्योजकांना गुंतवणूकदारांची साथ

तीन दिवसीय कार्यक्रमात एकूण 30 उद्योजकांना सादरीकरणाची संधी; व्यवसाय विस्तार, मेंटरिंग आणि ब्रँड डेव्हलपमेंटसाठी मिळणार पाठबळ

172
कोकण बाजार STARTUP जत्रा 2026 कार्यक्रमातील उपस्थित उद्योजक
कोकण बाजार STARTUP जत्रा 2026 मध्ये विविध उद्योजक एकत्र आले.

Kokan Bazar : मराठी उद्योजकांना संधींचे सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, मुंबईमध्ये ‘कोकण बाजार STARTUP जत्रा 2026’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी उद्योजक आणि स्टार्टअप्सना गुंतवणूकदार, तज्ज्ञ आणि शासनाच्या विविध योजनांशी जोडणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विशेष म्हणजे, या उपक्रमात एकूण 9 स्टार्टअप्सना गुंतवणूक, ब्रँड डेव्हलपमेंट, व्यवसाय विस्तार आणि मेंटरिंगसाठी प्रत्यक्ष सहाय्यता मिळण्यास सुरुवात झाली.

दादर येथील जी.एस. स्क्वेअर गाईड पॅव्हेलियन येथे, 12 ते 14 जूनदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विविध उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामध्ये एकूण 80 जणांनी सहभाग घेतला होता, ज्यापैकी निवड झालेल्या 30 उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय संकल्पना आणि स्टार्टअप्सचे सादरीकरण करण्याची संधी प्राप्त झाली.

हेही वाचा: बाईपण भारी देवा! चार सख्ख्या बहिणींनी जिद्दीच्या जोरावर केली मोठी कामगिरी…

निवडक स्टार्टअप्सना गुंतवणूक आणि मार्गदर्शन

सादरीकरणांनंतर निवड झालेल्या 9 स्टार्टअप्सना गुंतवणूक, व्यवसाय विस्तार, ब्रँड डेव्हलपमेंट आणि मेंटरिंगसाठी मदत मिळण्यास सुरुवात झाली असून, अन्य सहभागी उद्योजकांनाही पुढील काळात U MOTIVATORS संस्थेमार्फत व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि नेटवर्किंग उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (MITRA) संचालक अजय वैद्य आणि संचालक (वित्त) सुनील पिंपळकुठे उपस्थित होते. त्यांनी शासनाच्या विविध योजना, उद्योजकांसाठी उपलब्ध संधी आणि सहाय्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र शासन हे उभरत्या उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, उद्योगवृद्धीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गुंतवणूकदार, तज्ज्ञ आणि आयोजकांची महत्त्वपूर्ण भूमिका

कार्यक्रमातील इन्व्हेस्टर पॅनेलमध्ये स्वप्नील शिरसेकर (संस्थापक, 9/11 ऐक्यम) आणि योगिता लांजेकर (संस्थापक, ACCGLOBE Consultancy Services) हे सहभागी होते. त्यांनी उद्योजकांना गुंतवणूक, आर्थिक नियोजन, बाजारपेठेतील संधी आणि व्यवसाय विस्ताराबाबत मार्गदर्शन केले.

तर ज्युरी सदस्य म्हणून चारुदत्त पांडे (सहसंस्थापक, सुहृद कन्सल्टंट), राहुल भांडारकर (संस्थापक, नेक्स्ट जेन अकॅडमी) आणि संजय मोरे (संस्थापक, करिअर मेकर अकॅडमी) यांनी स्टार्टअप्सचे मूल्यमापन केले.

हेही वाचा: डोंबिवलीकरांची डोकेदुखी संपणार; रेतीबंदर रेल्वे फाटकावरील बहुप्रतीक्षित चार पदरी उड्डाणपुलाला मंजुरी! 

U MOTIVATORS संस्थेचे संस्थापक मंगेश सावंत, सहसंस्थापक डॉ. प्रांजळ सुर्वे, अॅड. रविंद्र भोसले, ओंकार मर्ढेकर तसेच कोकण बाजारचे संस्थापक श्रीकांत कोकाटे आणि जयेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाच्या निमित्ताने, मराठी उद्योजकांना गुंतवणूक, मार्गदर्शन, राज्य सरकारचा पाठिंबा आणि उद्योगवृद्धीसाठी आवश्यक असलेले विविध घटक एकाच व्यासपीठावर उपलब्ध झाले. सहभागी उद्योजकांनी या संकल्पनेचे स्वागत केले असून, भविष्यात राज्यभरात अशाच स्वरूपाच्या स्टार्टअप जत्रांचे आयोजन करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.