जागतिक पातळीवर भारताचा डंका; आयुष मंत्रालयाचा थेट ‘योग’ प्रक्षेपणात नवा Guinness World Record 

80
योग साधना करताना सहभागी नागरिक
सामाजिक एकतेसाठी योग साधना.

आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) २०२६ चे औचित्य साधून भारताच्या आयुष मंत्रालयाने जागतिक स्तरावर एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरील थेट प्रक्षेपणादरम्यान एकाच वेळी लाखो नागरिकांनी एकत्र योग साधना केल्याने एका नव्या जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. या विशेष जागतिक ऑनलाइन योग सत्रात ४ लाख ३५ हजार ८३१ प्रमाणित प्रेक्षकांनी सहभाग नोंदवला, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. या ऐतिहासिक यशामुळे भारतीय योग परंपरेची जागतिक ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. (Guinness World Record)

(हेही वाचा – Beed : बाईपण भारी देवा! चार सख्ख्या बहिणींनी जिद्दीच्या जोरावर केली मोठी कामगिरी…)

जुना विक्रम मोडला
आयुष मंत्रालयाने यापूर्वी २०२४ मध्ये प्रस्थापित केलेला २ लाख ४६ हजार २५२ प्रेक्षकांचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे. या वेळच्या मोहिमेत तब्बल १ लाख ८९ हजार ५७९ अधिक प्रेक्षकांची नोंद झाली असून हा आकडा पार करत भारताने नवा जागतिक कीर्तिमान स्थापित केला. या कार्यक्रमात प्रमाणित योग कार्यपद्धतीचे सादरीकरण करण्यात आले. देश-विदेशातील योग साधक, तरुण विद्यार्थी, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक आणि आरोग्य जागरूक नागरिकांनी या ऑनलाईन उपक्रमात अत्यंत उत्साहाने भाग घेऊन या चळवळीला यशस्वी केले.

(हेही वाचा – सूर्य चौहानच्या हत्येनंतर प्रशासनाची कारवाई सुरूच; ट्रोनिका सिटीमधील अनधिकृत Mazar केला जमीनदोस्त)

‘योग ३६५’ चळवळ आणि निरोगी आरोग्याचा संकल्प
या ऐतिहासिक प्रसंगी केंद्रीय मंत्र्यांनी सर्व सहभागी नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. योग हा केवळ एका दिवसाचा सण नसून ती एक जीवनपद्धती व्हावी, या हेतूने मंत्रालयाने ‘योग ३६५’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे, ज्याचा उद्देश प्रत्येक घरात दररोज योगाभ्यास पोहोचवणे हा आहे. या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित असून, त्याचा मुख्य सोहळा पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आयोजित केला जाणार आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.