NCP मध्ये धुसफूस, भुजबळांची भाजपा नेत्याच्या दारात ‘नाइट मीटिंग’; बावनकुळेंचा मोठा खुलासा

82
भुजबळ आणि बावनकुळे यांची नाइट मीटिंगची छायाचित्र.
NCP मध्ये धुसफूस, भुजबळांची भाजपा नेत्याच्या दारात 'नाइट मीटिंग'; बावनकुळेंचा मोठा खुलासा
  • प्रतिनिधी

NCP                      ​राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली असून, पक्षाच्या बैठकीत घडलेल्या नाट्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रफुल पटेल यांच्या अनुपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठकीत पक्षातील अपमानाची खंत व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला होता. पक्षावरील टीकेच्या काळात कोणीही पाठीशी उभे राहिले नाही, अशी व्यथा त्यांनी मांडल्याने बैठकीत वातावरण तापले होते. याच मुद्द्यावरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. (NCP)

​भुजबळ यांनी जरी माध्यमांसमोर या वादावर सावध प्रतिक्रिया दिली असली आणि आपण तटकरेंना केवळ ‘आवरतं घेण्याचा’ सल्ला दिल्याचे म्हटले असले, तरी त्यांच्या हालचालींनी राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बैठकीनंतर लगेचच छगन भुजबळ यांनी भाजपच्या एका बड्या नेत्याची भेट घेतल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीबाबत अधिक स्पष्टीकरण देताना भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. “सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात कोणताही वाद झालेला नाही. छगन भुजबळ काल रात्री उशिरापर्यंत माझ्यासोबतच होते, त्यामुळे वादाच्या बातम्या निराधार आहेत,” असे म्हणत बावनकुळेंनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. (NCP)

(हेही वाचा – India Iran News: १० भारतीय खलाशांची इराणमधून सुटका! जुलै २०२५ पासून होते डांबून, प्रकरण काय?)

​या भेटीच्या निमित्ताने बावनकुळेंनी ओबीसी आरक्षणासह अन्य महत्त्वाच्या विषयांवरही भाष्य केले. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातून केंद्राकडे प्रलंबित प्रश्न मांडले जाणार असून, मराठा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा समतोल राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करत, महायुतीचे जागावाटप ९९ टक्के पूर्ण झाल्याचा दावाही बावनकुळेंनी केला. (NCP)

​दरम्यान, काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या अश्लाघ्य टीकेचा बावनकुळेंनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. सपकाळ यांनी राजकीय संस्कृती पाळावी, अन्यथा भाजप कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत, असा सज्जड इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष आणि त्यानंतरची भाजप नेत्यांशी वाढलेली जवळीक, या सर्व घडामोडी आगामी काळात महायुतीच्या राजकारणाला कोणती कलाटणी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (NCP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.