
-
कल्याण, प्रतिनिधी
Kalyan Crime कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी विचित्र पण धक्कादायक नमुना चव्हाट्यावर आणला आहे. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी पालक मंडळी आपल्या मुलांच्या शिक्षणाकरिता रक्ताचे पाणी करून अहोरात्र झटत असतात. जीवाचे रान करणाऱ्या पालकांचे समाजमन कौतुक करत असते. मात्र कल्याणात पालकांनी आपल्या कोवळ्या वयातील मुलांना चक्क चोऱ्या-घरफोड्यांचे प्रशिक्षण देऊन गुन्हेगारी विश्वात ढकलून दिल्याचा प्रकार एमएफसी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. स्वतःच्या मुलांना चोऱ्यांचे धडे देणाऱ्या, तसेच बंद घरे फोडल्यानंतर चोरलेल्या सोन्या-चांदीचे दागिने विकणाऱ्या पालकांचा कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पाच जणांच्या टोळक्याकडून ४ घरफोड्या उघडकीस आणून २१ लाख ६० हजार रूपये किंमतीचे १८ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकारामुळे बालसुरक्षा आणि पालकांच्या जबाबदारीबाबतचा गंभीर प्रश्न अधोरेखित झाला आहे. (Kalyan Crime)
विलास प्रकाश भालेराव (३८, रा. मोहने, आंबिवली, ता. कल्याण) आणि दिपक अशोक जाधव (४०, रा. अंबिवली, कल्याण) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर शुक्रवारी रात्री अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तर या दोघांच्या दोन अल्पवयीन मुलांसह कैलास विलास भालेराव (१९) यालाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींची संख्या ५ झाली आहे. यातील १४ आणि १५ वर्षीय असलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांना भिवंडीतील बालन्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर विलास भालेराव, दिपक जाधव आणि विकासाचा मुलगा कैलास भालेराव या तिघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Kalyan Crime)
(हेही वाचा – Shirdi Defence Hub: थेट चीनला टक्कर; शिर्डीतील ‘डिफेन्स हब’ उंचवणार देशाचा स्तर)
कल्याण पश्चिमेकडील रामबाग लेन नंबर ४ परिसरात असलेल्या आशू अपार्टमेंटमध्ये राहणारे एम. अरविंद राजाराम पै (४९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होणमाने यांच्या मागदर्शनानुसार एमएफसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बलिरामसिंग परदेशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक विजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली सपोनि स्वप्निल भुजबळ, पोउपनि विकास मडके, हवा. साळुंखे, कांगरे, जाधव, तडवी, सुर्यवंशी, दिपक थोरात, सोळसे, कोळी यांच्या पथकाची निर्मिती केली. या पथकाने तपासादरम्यान खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार कैलास भालेराव या १९ वर्षीय संशयिताला बुधवारी १३ मे रोजी आंबिवली जवळच्या मोहन्यातून ताब्यात घेतले. (Kalyan Crime)
त्यानंतर दोघा अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी कैलास भालेराव आणि दोघा अल्पवयीन मुलांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मुलांचे वडील विलास भालेराव व दिपक जाधव हे दोघे कल्याणातील काही सोसायट्यांमध्ये साफसफाई आणि मजुरीचे काम करत असत. आपले काम करत असताना त्या भागातील सोसायट्यांमध्ये रेकी करून त्यातील बंद घरांची माहिती आपल्या मुलांना द्यायचे. त्यानुसार कैलास भालेराव हा आपल्या दोघा अल्पवयीन साथीदारांच्या साह्याने सोसायटीतील बंद घरांचे दरवाजाचे कडी-कोयंडे मौल्यवान चिजवस्तू तसेच रोख रक्कम चोरी करायचे. चोरी करून आणलेल्या पैशांतून हे तिघे मौजमज्जा करत असत. मात्र सोन्या-चांदीचे दागिने विलास भालेराव आणि दिपक जाधव या दोघांच्याकडे विक्रीसाठी देत असत. या सगळ्याचा भांडाफोड करून पोलिसांनी पाचही बदमाशांकडून एकूण ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या टोळीकडून आतापर्यंत १ मंगळसूत्र, २ गंठण, ३ बांगड्या, असे एकूण १८ तोळे वजनाचे २१ लाख ६० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पालकच आपल्या मुलांना गुन्हेगारीच्या वाटेवर ढकलत असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये संतापाची भावना व्यक्त करण्यात येत आहे. या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचाही चौकस तपास करण्यात येत आहे. (Kalyan Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
