Gadchiroli : नक्षल कमांडर हिडमाच्या गाण्यावर नृत्य करणे पडले महागात; ५ जणांवर गुन्हा

130
नक्षल कमांडर हिडमा माडवी याचा फोटो
Gadchiroli : नक्षल कमांडर हिडमाच्या गाण्यावर नृत्य करणे पडले महागात; ५ जणांवर गुन्हा

Gadchiroli                नक्षलवादी संघटनेच्या कुख्यात कमांडरचे उदात्तीकरण करणाऱ्या गाण्यावर सार्वजनिक कार्यक्रमात नृत्य केल्याप्रकरणी एटापल्ली तालुक्यातील ५ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका लग्नसमारंभात मृत नक्षलवादी कमांडर हिडमा माडवी याच्या जीवनावर आधारित गाणे मोठ्या आवाजात वाजवून उपस्थितांना भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (Gadchiroli)

(हेही वाचा – Hindustan Post Impact : धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे उघडले कवाड; बाळगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकही सुखावले)

नेमकी घटना काय?

एटापल्ली तालुक्यातील कृष्णार येथे ६ मे रोजी रात्री एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शंकर हिचामी यांच्या मालकीच्या डी. जे. संचावर पारंपरिक आदिवासी नृत्य सुरू असताना हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. कार्यक्रमादरम्यान बाबुराव कांदो याने कथितरीत्या “पोलीस आदिवासी गावात कोणाच्या परवानगीने आले, नक्षलवादीच चांगले होते”, अशी प्रक्षोभक विधाने करत उपस्थितांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. तसेच “आपला नेता हिडमा आहे, त्याचेच गाणे लावा”, असा आग्रहही त्याने धरल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर चैतू रुषी तेलामी याने जहाल नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्या जीवनावर आधारित गाणे डी. जे. ऑपरेटरकडे दिले. त्यानंतर आर्यन हिचामी आणि शरद कांदो यांनी ते गाणे मोठ्या आवाजात वाजवले. या गाण्यावर सुमारे ४० ते ५० युवक-युवती नृत्य करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. (Gadchiroli)

(हेही वाचा – Maharashtra Rain Alert: राज्यावर ‘दुहेरी’ सावट; ‘या’ भागांत मुसळधार पाऊस व गारपिटीची शक्यता)

पोलिसांची कारवाई 

या संपूर्ण प्रकाराची चित्रफित ७ मे रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाली. पोलिसांनी व्हिडिओची पडताळणी केली असता, संबंधित गाण्यातील मजकूर नक्षलवाद्यांचे समर्थन करणारा तसेच शासनविरोधी भावना भडकवणारा असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस शिपाई रोशन कान्हुजी पुराम यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे : १. शंकर हिचामी २. बाबुराव कांदो ३. चैतू रुषी तेलामी ४. आर्यन हिचामी ५. शरद कांदो (सर्व रा. कृष्णार) (Gadchiroli)

(हेही वाचा – अखेर तामिळनाडूतील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; TVK ने बहुमताचा आकडा जमवला)

राज्यातील दुसरी घटना 

नक्षल कमांडर हिडमाच्या गाण्यावर गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी पुण्यातील एका शासकीय वसतिगृहात अशाच प्रकारे गाण्यावर नृत्य केल्याप्रकरणी गडचिरोलीच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. समाजात शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही प्रकाराला सहन केले जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. (Gadchiroli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.